close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

देशाने आम्हाला इतकं भरभरून दिलंय की चुकीच्या मार्गावर जाण्याची गरजच नाही- मोदी

या भाषणात नरेंद्र मोदी यांनी आणीबाणी, समान नागरी कायदा, शहाबानो प्रकरण आदी मुद्द्यांचा उल्लेख करत काँग्रेसवर तोफ डागली.

Updated: Jun 25, 2019, 06:48 PM IST
देशाने आम्हाला इतकं भरभरून दिलंय की चुकीच्या मार्गावर जाण्याची गरजच नाही- मोदी

नवी दिल्ली: देशातील जनतेने आम्हाला इतकं भरभरून दिलंय की आम्हाला चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्याची गरजच नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना बोलत होते. यावेळी मोदींनी आधुनिक भारताच्या निर्मितासाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. 

या भाषणात नरेंद्र मोदी यांनी आणीबाणी, समान नागरी कायदा, शहाबानो प्रकरण आदी मुद्द्यांचा उल्लेख करत काँग्रेसवर तोफ डागली. त्यांनी म्हटले की, काँग्रेसने देशाच्या प्रगतीच्या मुद्द्यावरही भेदभाव केला. जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था ११व्या स्थानावर पोहोचली, तेव्हा संसदेत आनंद व्यक्त गेला. मात्र, काही दिवसांपूर्वीच हीच भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर पोहोचली तेव्हा यापैकी काहीच घडले नाही. त्यामुळे तुम्ही इतक्या उंचावरही बसून राहू नका की, खालचे काहीच दिसणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला. 

या देशात केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया योजनेची खिल्ली उडवण्यात आली. मला यावरून कोणावरही टीका करायची नाही, कारण मला खूप कामं आहेत. परंतु, आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, भारतासारख्या देशाला शस्त्रास्त्रे तयार करण्याचा २०० ते २५० वर्षांचा अनुभव आहे. देश स्वतंत्र झाले तेव्हा आपल्याकडे शस्त्रनिर्मिती करणारे अनेक कारखाने होते. मात्र, चीन स्वतंत्र झाला तेव्हा ते शस्त्रास्त्र निर्मितीच्या क्षेत्रात शून्यावर होते. मात्र, आजची परिस्थिती पाहिल्यास चीन शस्त्रास्त्रे निर्यात करणारा देश आहे. तर भारत शस्त्रास्त्रांचा जगातील सर्वात मोठा आयातदार आहे. हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे. 

त्यामुळे आपण भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारतात पर्यटन क्षेत्राच्या विकासाची मोठी संधी आहे. मात्र, आपणच आपल्या देशाविषयी हीनतेची भावना निर्माण केली. त्यामुळे जगभरातील लोकांना आकर्षित करण्यात आपण कमी पडलो. परंतु, आता पर्यटन क्षेत्राचा विकास केल्यास देशात रोजगाराच्या संधी वाढतील. जागतिक स्तरावर देशाची नवी ओळख निर्माण होईल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

आगामी काळात केंद्र सरकार देशातील सामान्य माणसाचे जीवन सुलभ करण्यासाठी जगभरातील व्यवस्था भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करेल. हे करताना गाव आणि शहरांचा समान विकास होईल, याकडे लक्ष दिले जाईल. आमच्या सरकारला केवळ ३ आठवडे झालेत, पण अनेक मोठे निर्णय घेतले गेले आहेत. पाण्याच्या संकटाची आमचे सरकार गांभीर्याने दखल घेणार आहे. कारण शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीतल्या पारंपरिक पद्धतींतून आपण बाहेर यायला हवे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.