आयोगाने निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम मोदींच्या प्रचारासाठीच आखला होता- राहुल गांधी

गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेसने अत्यंत समर्थपणे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली.

Updated: May 17, 2019, 05:27 PM IST
आयोगाने निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम मोदींच्या प्रचारासाठीच आखला होता- राहुल गांधी title=

नवी दिल्ली: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिका ही पक्षपाती होती, हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. किंबहुना निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रमच नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी आखण्यात आला होता, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. 

१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याच्या प्रचाराची सांगता होत असताना राहुल गांधी यांनी दिल्लीत ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेसने अत्यंत समर्थपणे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली. आमच्या पक्षाने नरेंद्र मोदी यांना घेतले. तसेच नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचारविरोधी ही प्रतिमा पूर्णपणे उद्ध्वस्त केली. गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेसने शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरले. अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलनाला दिशा दिली. तसेच गरिबांच्या कल्याणासाठी न्याय योजनेचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने आपली भूमिका चोखपणे पार पाडली आहे. आता सर्वकाही जनतेच्या हातात आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांमध्ये एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुक्रवारी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदा एकाचवेळी सुरु होत्या. यावेळी प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींनी राहुल यांना नरेंद्र मोदींच्या पहिल्यावहिल्या पत्रकार परिषदेविषयी प्रतिक्रिया विचारली. त्यावर राहुल यांनी मोदींच्या या कृतीचे स्वागत केले. मात्र, मोदी या पत्रकार परिषदेला एकटेच न येता अमित शहा यांना सोबत घेऊन का आले? एवढेच होते तर नरेंद्र मोदींनी जाहीर चर्चेचे माझे निमंत्रण का स्वीकारले नाही?, असे सवाल राहुल यांनी उपस्थित केले. 

याशिवाय, राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीवरही टीका केली. मोदींची विचारसरणी ही महात्मा गांधी यांची विचारसरणी नाही. तर ती हिंसेची विचारसरणी आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे 'गॉड-से' प्रेमी नसून 'गोडसे' प्रेमी असल्याची शाब्दिक कोटीही राहुल यांनी केली. तसेच भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांना कोणतेही स्थान नसल्याची टीकाही त्यांनी केली. ज्येष्ठ नेत्यांना पक्षातून धक्के मारून बाहेर काढायला, मी नरेंद्र मोदी नाही. आमच्या पक्षातील सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा मी पक्षासाठी फायदा करून घेईन, असेही राहुल यांनी सांगितले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x