India's 75th Independence Day: PM मोदींचं 'हर घर तिरंगा' अभियान नक्की काय आहे? जाणून घ्या

'हर घर तिरंगा' अभियान, राष्ट्रध्वजाचा पहिला फोटो आणि 22 जुलैच्या इतिहासावर पंतप्रधान काय म्हणाले?

Updated: Jul 22, 2022, 03:38 PM IST
India's 75th Independence Day: PM मोदींचं 'हर घर तिरंगा' अभियान नक्की काय आहे? जाणून घ्या  title=

नवी दिल्ली : भारत देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. या आझादी का अमृत महोत्सवानिमित्त आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानात संपूर्ण देशवासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील मोदी यांनी केले आहे.  

अभियान​ काय? 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून 'हर घर तिरंगा' मोहिमेला बळ देण्याचे आवाहन केले. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे.

"आम्ही वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढत असताना स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वांचे धैर्य आणि प्रयत्न आज आम्हाला आठवत आहेत. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. 

22 जुलैचा इतिहास काय? 
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रध्वजाचा पहिला फोटो ट्विट करत 22 जुलैच्या इतिहासाची थोडक्यात माहिती दिली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याचे छायाचित्रही त्यांनी ट्विट केले. हा राष्ट्रध्वज म्हणून 22 जुलै 1947 रोजीच स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
 
'आजच्या 22 जुलैला आपल्या इतिहासात विशेष महत्त्व आहे, या दिवशी 1947 मध्ये आपला राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला होता.आमची तिरंगा समिती आणि पंडित नेहरूंनी फडकवलेला पहिला तिरंगा याचा फोटो आणि दस्तावेज शेअर केले.  

दरम्यान या संदर्भात गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'हर घर तिरंगा' मोहीम यशस्वी करण्यासाठी रविवारी सर्व राज्यपाल, नायब राज्यपाल, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि प्रशासक यांच्यासोबत बैठकही पार पडली आहे.