आग्रा : देशभरात तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. उन्हाने चाळीस अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघात आणि चक्कर येण्याच्या समस्याही वाढल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आग्राच्या (Agra) रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या जीआरपी पोलिसाचा मालगाडीखाली तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडलीय. हृदय हेलावून टाकणारा प्रसंग सीसीटीव्हीत (CCTV) कैद धालाय. आग्राच्या मंडी रेल्वे स्टेशनवर हा पोलीस तैनात होता. त्यावेळी मालगाडी जात असताना पोलिसाला चक्कर आली. आणि या पोलिसाचा तोल जाऊन रुळावर कोसळला. मालगाडी अंगावरून गेल्यानं या पोलिसांचा दुर्देवी मृत्यू झाला.
नेमकी घटना काय
आग्राच्या मंडी रेल्वे स्थानकावर एक पोलीस भर उन्हात उभा असलेला व्हिडिओत दिसत आहे. अचानक त्याला चक्कर येते, त्यामुळे त्याचा तोल जातो, तितक्यात मालगाडी येते आणि हा पोलीस मालगाडी खाली येतो. त्याचवेळी पोलिसाच्या समोर असलेली व्यक्ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो.
अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडिओवर सर्वांनीच दु:ख व्यक्त केलं आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.