विमा पॉलिसीचा हप्ता भरला नाही म्हणून शेजाऱ्याने कुटुंबाला संपवले

दशमीच्या दिवशी रात्री साडेदहा वाजता उत्पल बंधुप्रकाशच्या घरी गेला.

Updated: Oct 15, 2019, 04:11 PM IST
विमा पॉलिसीचा हप्ता भरला नाही म्हणून शेजाऱ्याने कुटुंबाला संपवले title=

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे झालेल्या निर्घृण हत्याप्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. आठ दिवसांपूर्वी मुर्शिदाबाद येथे पती-पत्नी आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाची हत्या झाली होती. या घटनेने मुर्शिदाबादचा परिसर चांगलाच हादरला होता. मात्र, पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत मारेकऱ्याला जेरबंद केले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याप्रकरणात उत्पल बेहरा (वय २०) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने बंधुप्रकाश पाल, त्यांची पत्नी ब्युटी पाल आणि पाच वर्षांचा मुलगा आंगण यांची निर्घृणपणे हत्या केली. विमा पॉलिसीच्या पैशांवरून हा सगळा प्रकार घडल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. 

उत्पलने पोलिसांसमोर या सगळ्याची कबुली दिली. बंधुप्रकाश पाल याने उत्पलला एक विमा पॉलिसी काढून दिली होती. या पॉलिसीचा वार्षिक हप्ता २४,१६७ इतका होता. पहिल्या वर्षात या पॉलिसीचा हप्ता भरल्यानंतर बंधुप्रकाश पालने उत्पलला पैसे भरल्याची पावती दिली होती. यानंतर दुसऱ्या वर्षाचा हप्ता भरण्यासाठीही उत्पलने बंधुप्रकाशकडे पैसे दिले होते. मात्र, बंधुप्रकाशने हे पैसे भरलेच नाहीत. यानंतर उत्पलने पैसे भरल्याची पावती मागितली तेव्हा बंधुप्रकाशने त्याला शिवीगाळ केली. हाच राग मनात ठेवून उत्पलने बंधुप्रकाश पाल आणि त्याच्या कुटुंबीयांची हत्या केली. 

या हत्येपूर्वी उत्पलने बंधुप्रकाश पाल राहत असलेल्या जियागंज परिसराची रेकीही केली होती. दुर्गापूजेसाठी उत्पल जियागंज येथे राहत असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी आला होता. यावेळी त्याने स्वत:सोबत हत्यारही आणले होते. अखेर दशमीच्या दिवशी रात्री साडेदहा वाजता उत्पल बंधुप्रकाशच्या घरी गेला. बंधुप्रकाशचे कुटुंबीय उत्पलला ओळखत असल्याने कोणालाही त्याचा संशय आला नाही. मात्र, घरात आल्यानंतर उत्पलने लगेच बंधुप्रकाश याच्यावर हत्याराने वार केले. यानंतर उत्पलने हत्येचा कोणताही पुरावा राहू नये यासाठी बंधुप्रकाशची गर्भवती पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलालाही ठार मारले. 

या हत्येचा तपास झाल्यानंतर पोलिसांनी उत्पलला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी उत्पलने आपण हत्येच्यावेळी सागरदिघी येथे असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याचे मोबाईल लोकेशन जियागंज परिसरात असल्याचे दिसून आले होते. अखेर पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर उत्पलने गुन्ह्याची कबुली दिली. हत्येच्यावेळी उत्पलकडे कपड्यांचे दोन जोड होते. यापैकी कपड्याचा पहिला जोड आणि हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र उत्पलने बंधुप्रकाशच्या घराजवळच टाकून दिले. 

दरम्यान, उत्पलच्या वडिलांनी त्यांच्या मुलावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझा मुलगा असे कृत्य करूच शकत नाही. मी त्याला असे आर्थिक व्यवहार न करण्याविषीय बजावले होते. मात्र, त्याने माझे ऐकले नाही, असे उत्पलच्या वडिलांनी म्हटले. 

तर बंधुप्रकाश पाल हा पेशाने शिक्षक होता. मात्र, तो चेन मार्केटिंग, विमा आणि अनेक व्यवसायांमध्ये गुंतला होता. पोलिसांनी याप्रकरणी बंधुप्रकाश पाल याचा भागीदार सौविक बनिक याला ताब्यात घेतले आहे. सौविक बनिक याने यापूर्वी अनेकांचे पैसे बुडवल्याची माहितीही तपासादरम्यान पुढे आली आहे.