PM Narendra Modi On Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 (आज) सादर केला. हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी सादर केला जाणारा हा अंतरिम अर्थसंकल्प असून, त्यानंतर निवडणुकांचे निकाल आणि सत्तास्थापना पार पडल्यानंतर सविस्तर अर्थसंकल्प देशातील सरकारकडून सादर केला जाईल. आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
"आज सादर झालेला अर्थसंकल्प हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून तो सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण आहे. या अर्थसंकल्पातून तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी या चार स्तंभांना सक्षम करण्यास मदत होणार आहे. हा अर्थसंकल्प भारताचे भविष्य घडवणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे भारतातील तरुणांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब आहे", असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
त्यापुढे ते म्हणाले, "या अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याबरोबरच या अर्थसंकल्पात स्टार्टअपला मिळणाऱ्या कर सवलतीदेखील विस्तार करण्यात आला आहे. तसेच गरिबांसाठी आम्ही गावात आणि शहरात 4 कोटींहून अधिक घरांची निर्मिती केली आहे. त्यानंतर आता त्यात 2 कोटींहून अधिक नवीन घर बनवण्यात येणार आहे. त्याबरोबरच 2 कोटींहून अधिक महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, आता ते वाढवून 3 कोटी करण्यात आले आहे."
"आज या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीही खूप महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नॅनो डीएपीचा वापर, पशु-पक्षांसाठी नवीन योजना, पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा विस्तार आणि आत्मनिर्भर तेलबियांचं उत्पादनावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल", असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वागत केले.