पुलवामा दहशतवादी हल्ला : कामरान याने हल्ल्याची योजना आखली?

पुलवामा  हल्ल्याची योजना पाकिस्तानचा नागरिक आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याने तयार केली होती, असा पोलिसांना संशय आहे. 

PTI | Updated: Feb 16, 2019, 09:26 PM IST
पुलवामा दहशतवादी हल्ला : कामरान याने हल्ल्याची योजना आखली? title=

नवी दिल्ली : सीआरपीएफच्या गाडीवर झालेला हल्ला एवढा भीषण होता की अनेकांच्या कानाचे पडदे अक्षरशः फाटले. परिसरातल्या घरांचे जबरदस्त नुकसान झाले आहे. घरांच्या काचा फुटल्या आहेत. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती की अनेकांना काही क्षण काय झालं हेच लक्षात आलं नाही एवढी सुन्नता वातावरणात पसरली होती. दरम्यान, या हल्ल्याची योजना पाकिस्तानचा नागरीक आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याने तयार केली होती, असा पोलिसांना संशय आहे. 

सात जण चौकशीसाठी ताब्यात

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराची ४० जवान शहीद झालेत. या हल्ल्याप्रकरणी सुरक्षादलाने कारवाई सुरू केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आज सात जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या सातही जणांकडे कसून चौकशी केली जात आहे. पुलवामा जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून या सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

येथे रचला गेला हल्ल्याचा कट

या भीषण दहशतवादी हल्ल्याचा कट पुलवामाच्या त्राल परिसरात रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. २०१६ मध्ये हिजबुलचा टॉप कमांडर बुरहान वानीचा खात्मा त्राल येथेच झाला होता. त्याच्या खात्म्यानंतर पुढील चार महिने काश्मीर खोऱ्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती. या हल्ल्याची योजना पाकिस्तानचा नागरीक आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याने तयार केली होती असा पोलिसांना संशय आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राल भागात तो जैशचं नेटवर्क सांभाळतो, अशी माहितीही पोलीस सूत्रांनी दिली असून त्याचाही शोध घेतला जात आहे.

काश्मीरमध्ये आज पुन्हा स्फोट

दरम्यान, आज पुन्हा काश्मीरमधील राजौरी क्षेत्रात स्फोट घडवून आणण्यात आला आहे. यात लष्कराचा वरिष्ठ अधिकारी शहीद झाला. भारतीय नियंत्ररेषेजवळ स्फोटके पेरण्यात आली होती. ही स्फोटके निकामी करताना स्फोट झाला. यात एक अधिकारी शहीद झाला तर एक जवान जखमी झाला.