राहुल गांधींच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाला वर्ष पूर्ण, दिलं हे आश्वासन

दिल्लीच्या अकबर रोड येथील पक्ष मुख्यालयात त्यांनी सोनिया गांधींकडून पदाची जबाबदारी घेतली होती. 

Updated: Dec 17, 2018, 08:47 AM IST
राहुल गांधींच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाला वर्ष पूर्ण, दिलं हे आश्वासन  title=

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कॉंग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास भरला आहे. कॉंग्रेस पक्ष आणखी मजबूत आणि संघटनात्मक करण्याचा शब्द राहुल गांधी यांनी दिला. गेल्या वर्षी 16  डिसेंबरला राहुल गांधी यांची कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली होती. दिल्लीच्या अकबर रोड येथील पक्ष मुख्यालयात त्यांनी सोनिया गांधींकडून पदाची जबाबदारी घेतली होती. 

कॉंग्रेस अध्यक्ष या नात्याने मी पक्षाला अधिक मजबूत, एकजुट आणि उज्वल बनविण्यासाठी कटबिद्ध असल्याचा पुनरोच्चार करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 'तुमच्याकडून मिळालेल्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे मला आनंद झालाय. तुम्हा सर्वांचे यासाठी खूप आभार' असे ट्वीट त्यांनी केले आहे.

1 वर्षात कॉंग्रेसला काय मिळाले ? 

2014 मध्ये केंद्रातील सत्ता हातातून गेल्यानंतर अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणूकीतही कॉंग्रेसला हार पत्करावी लागली होती.  पण गेल्या वर्षभरात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसला दूर गेलेली सत्ता पुन्हा मिळाली. नुकत्याच आलेल्या निकालानुसार कॉंग्रेसने भाजपाला छत्तीसगड, राज्यस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये धुळ चारली. या एका वर्षातले राहुल गांधींचे हे मोठे यश मानले जाते.

विरोधकांना एकत्र करण्यात यश 

भाजपाशी दोन हात करण्यासाठी विरोधकांना एकत्र घेऊन लढण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नशिल आहेत. 17 डिसेंबरला होणाऱ्या तीन राज्यांच्या शपथविधी सोहळ्यात याची एक झलक देखील पाहायला मिळू शकते. देशातील लोकसभा निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. कॉंग्रेसची अचानक वाढलेली लोकप्रियता भाजपसाठी धोक्याची घंटा देखील ठरु शकते असे देखील म्हटले जात आहे.