सत्ता द्या, १० दिवसात शेतकरी कर्जमाफीची गॅरेंटी: राहुल गांधी

मध्य प्रदेशातील मंदसौर येथून काँग्रेसने विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि मध्य प्रदेशची जनता बहूसंख्येने उपस्थित होती.

Updated: Jun 6, 2018, 02:49 PM IST

 

 

मंदसौर: विद्यमान भाजप सरकार हे अत्यंत असंवेदनशील आहे. या सरकारला शेतकऱ्यांची काहीही चिंता नाही, अशी टीका करत राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, काँग्रेस सरकार सत्तेत येताच अवग्या १० दिवसांत शेतकऱ्याचे कर्ज माफ केले जाईल, अशी खात्री देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्यांवर कडक कारवाई करून दाखवू असेही राहुल गांधी यांनी उपस्थितांना सांगितले. 

मध्य प्रदेशातील मंदसौर येथून काँग्रेसने विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि मध्य प्रदेशची जनता बहूसंख्येने उपस्थित होती. या वेळी उपस्थितांना संभोधीत करताना राहुल गांधी काहीसे आक्रमक झालेले पहायला मिळाले. विशेष असे की या भाषणात राहुल गांधी हे नेहमीच्या तुलनेत अधिक आत्मविश्वासून जाणवत होते. 

राहुल गांधी यांनी मंदसौर येथून भाषण करताना मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली. शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार, शेतकरी कर्जमाफी तसेच, निरव मोदी, विजय मल्या यांनी केलेल्या भ्रष्टाचारावरूनही राहुल यांनी सरकारवर निशाणा साधला.