Rahul Gandhi on Narendra Modi government : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एनडीए सरकारसाठी राहुल गांधींनी धोक्याचा इशारा दिलाय. स्वबळावर बहुमताचा आकडा गाठू न शकलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली. त्यामुळं मोदी 3.0 सरकार कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत शंका व्यक्त केल्या जात असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधींनी खळबळजनक दावा केलाय. एनडीएचे अनेक खासदार आमच्या संपर्कात असून एका छोट्या चुकीमुळं एनडीए सरकार कोसळू शकतं, असा दावा राहुल गांधींनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय.
एनडीएचे अनेक खासदार आमच्या संपर्कात आहेत. सरकारमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. छोट्या चुकीमुळे एनडीए सरकार कोसळू शकतं. 2024 मध्ये भाजपला अपेक्षित निकाल लागला नाही. पूर्ण बहुमतासाठी भाजपला मित्रपक्षांचा पाठिंबा मागावा लागला. अशा स्थितीत एनडीएसरकारला पुढे जाण्यासाठी अनेक संघर्षांचा सामना करावा लागेल, असा दावा राहुल गांधींनी केलाय.
दरम्यान, राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याची खिल्ली उडवलीय. भाजपला स्वबळावर बहुमतापासून रोखण्यात विरोधकांच्या इंडिया आघाडीला यश आलंय. त्यामुळं चंद्राबाबूंची टीडीपी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूसह मित्रपक्षांच्या मदतीनं भाजपला सत्तेचं शिखर गाठावं लागलं. आता राहुल गांधींनी थेट एनडीएचे खासदारच संपर्कात असल्याचा दावा केल्याने सत्ताधारी गोटात खळबळ उडालीय. आता या दाव्यात किती तथ्य आहे, ते लवकर कळेल.
दरम्यान, भाजपच्या दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील नेत्यांना सर्वांना सोबत घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. महाराष्ट्रात भाजप कोणा एका व्यक्तिवर अवलंबून राहणार नाही अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्याची माहिती समोर येतेय. लोकसभेत झटका बसल्यानंतर भाजपनं विधानसभेसाठी रणनिती ठरवण्यास सुरूवात केलीये. तर महाविकास आघाडीला राज्यात रोखण्यासाठी भाजपला एकत्र काम करावं लागेल अशीही चर्चा दिल्लीतील बैठकीत झाल्याचं समजतंय. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व भाजप नेत्यांनी सक्रीय होण्यासह आतापासूनच विधानसभेसाठी उमेदवार तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.