Sonia Gandhi Oxygen Mask Photo: काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सोशल मीडियावर सोनिया गांधींचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो एका विमानातील आहे. बंगळुरुवरुन परत येताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी प्रवास करत असलेल्या विमानाची आप्तकालीन लॅण्डींग करण्यात आली होती. विमानाने आप्तकालीन लॅण्डींग केलं तेव्हा सोनिया गांधी तोंडावर ऑक्सीजन मास्क लावून बसल्या होत्या. या फोटो सोनिया गांधी अगदी शांतपणे बसल्याचं दिसत आहे. राहुल गांधींनी हा फोटो शेअर करताना एक भावनिक कॅप्शनही दिली आहे.
झालं असं की, बंगळुरुमध्ये 17 आणि 18 जुलै रोजी विरोधीपक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर दिल्लीला परतताना सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या विमानाचं आपत्कालीन लॅण्डींग करावं लागलं. भोपाळजवळ आल्यानंतर विमानामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने आपत्कालीन लॅण्डींग करण्यात आलं. याच आप्तकालीन लॅण्डींगदरम्यान सोनिया गांधी विमानात ऑक्सीजन मास्क लावून बसल्या होत्या. राहुल गांधींनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सोनिया गांधींचा हा फोटो शेअर केला आहे.
राहुल गांधींनी या फोटोला, 'Ma, the epitome of grace under pressure' अशी कॅप्शन दिली आहे. म्हणजेच, तणाव असतानाही शांत राहणारी व्यक्ती म्हणजे आई, असं या कॅप्शनमधून राहुल यांना म्हणायचं आहे. आपत्कालीन लॅण्डींगदरम्यान श्वास कमी पडू शकतो याच कारणाने सामान्यपणे अशा लॅण्डींगच्या वेळेस वयस्कर व्यक्ती ऑक्सिजन मास्कचा वापर करतात. त्यामुळेच 76 वर्षीय सोनिया गांधींनी विमानाचं आपत्कालीन लॅण्डींग होताना मास्क लावलं होतं.
या फोटोमध्ये सोनिया गांधी तणावात दिसत नसून फारच शांत दिसत आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमानातील केबिन प्रेशर कमी झाल्याने आपत्कालीन लॅण्डींग करण्यात आलं. यासंदर्भातील सविस्तर माहिती राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये दिलेली नाही. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि मध्य प्रदेशमधील महिला आयोगाच्या माजी प्रमुख शोभा ओझा यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी प्रवास करत असलेल्या चार्टड विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लॅण्डींग करण्यात आल्याचं सांगितलं.
राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या विमानाचं आत्पकालीन लॅण्डींग भोपाळमध्ये झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शोभा ओझा, माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, आमदार पी. सी. शर्मा, आरिफ मसूद आणि कुणाल चौधरींबरोबर अनेक काँग्रेस नेते विमानतळावर दाखल झाले होते. या आत्पकालीन लॅण्डींगनंतर रात्री साडेनऊ वाजता सोनिया गांधी आणि राहुल गांधी इंडिगोच्या विमानाने दिल्लीला रवाना झाले अशी माहिती मध्य प्रदेशमधील नेत्यांनी दिली.
सोनिया गांधींना 2 वेळा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील वर्षी ऑगस्ट आणि जून महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. जून 2022 मध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली.