Rahul gandhi vs Anurag Thakur : संसदेत जातीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा पहायला मिळाला. ज्या लोकांना आपली जात माहित नाही, ते जातनिहाय जनगणनेची मागणी करतात, असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी वक्तव्य केलंय. त्यावरून राहुल गांधींनी जोरदार पलटवार केला. अनुराग ठाकूर यांनी मला शिवी दिलीय, असं राहुल गांधी म्हणाले. परंतु मला त्यांच्याकडून कुठल्याही माफीची अपेक्षा नाही असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, कुणी मंत्री कुणाची जात कशी काय विचारू शकतो, असा तिखट सवाल अखिलेश यादवांनी यावेळी केला. यामुळं संसदेत जोरदार गदारोळ झाला.
ज्यांना आपली जात माहीत नाही, ते जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहेत, अशी वादग्रस्त टिप्पणी भाजपचे अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उद्देशून केल्यानंतर त्यावर आक्षेप घेत गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत तीव्र आक्षेप घेतला. ‘ठाकूर यांनी मला शिव्या दिल्या; पण मला त्यांची माफी नको, मी लढत राहीन,’ असं संतप्त राहुल गांधी म्हणाले.
सभागृहात २०२४-२५ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान भाजपचे अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत काही टीका केली, त्यावरून इंडिया आघाडीने गदारोळ सुरू केला. यावेळी अखिलेश यादव यांनीही ठाकूर यांना सुनावले. पीठासीन अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी काही आक्षेपार्ह आढळल्यास ते तपशिलातून काढून टाकण्यात येईल, असे आश्वासन दिले.
राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही माझा अपमान करू शकता, तुम्ही ते आनंदाने करू शकता. तुम्ही ते रोज करा. पण, एक गोष्ट विसरू नका, की आम्ही जात जनगणना करायलाच लावू. अर्जुनाप्रमाणे मला फक्त माशाचा डोळा दिसतो आणि देशात जात आधारित जनगणना करणारच. अनुराग ठाकूरजींनी मला शिवी दिली आहे. त्यांनी माझा अपमान केला आहे. पण मला त्यांच्याकडून माफी नको आहे. मी एक लढाई लढत आहे.”
ठाकुरांच्या वक्तव्यावरून लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकुरांचं भाषण ट्विट करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करत पंतप्रधानांवर टीकास्त्र डागलंय.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधींच्या अजेंड्यामध्ये भाजप अडकताना दिसतेय. आता राहुल गांधींच्या जातीय जनगणनेच्या ट्रॅपमध्ये भाजप चेकमेट झाल्याचं पाहायला मिळतंय.