मुंबई : नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच भारतीय रेल्वे प्रवाशांना मोठं गिफ्ट देणार आहे. 2019 पासून रेल्वे प्रवासादरम्यान तुम्हाला शॉपिंगची सुविधा मिळणार आहे. याशिवाय रेल्वे गाड्यांमध्ये रोबोट देखील तुम्हाला दिसणार आहेत. किन्नरांसाठी नवी योजना सुरू होत आहे. अशा पाच सुविधांबद्दल आपण जाणून घेऊया...
नव्या वर्षात रेल्वेकडून एक खास सुविधा मिळणार आहे. रेल्वे प्रवासा दरम्यान घरातील गरजेच्या वस्तूंपासून इतर महत्त्वाच्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. दोन रेल्वेपासून याची सुरूवात होणार असून प्रत्येक चरणात दोन दोन रेल्वेमध्ये ही सुविधा मिळणार आहे. घरगुती वस्तूंसोबत ब्युटी प्रोडक्ट तसेच अनेक वस्तू विकण्याची परवानगी मिळणार आहे. सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंतच या वस्तू विकता येणार आहेत. गणवेशधारी दोन कर्मचाऱ्यांकडे याची जबाबदारी असेल. तसेच ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडीट कार्डची सुविधाही मिळणार आहे.
कुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आगामी वर्षात रेल्वेकडून नव्या वर्षात आनंदाची बातमी आहे. कुंभमेळ्यासाठी 800 स्पेशल गाड्या धावणार आहेत. याशिवाय प्रवाशांसाठी बायोटॉयलेटची सुविधा सुरू होणार आहे. कुंभशी निगडीत फोटो रेल्वे कोचमध्ये पाहायला मिळणार आहेत.
नागपूर डिव्हीजनच्या मॅकेनिकल ब्रॅंचने अंडरगियर सर्विलांस थ्रू आर्टिफिशियल इंटेलिजेंस असिस्टेड ड्राइड म्हणजेच उस्ताद नावाचा एक रोबोट डेव्हलप केला आहे. हा रोबोट ट्रेनच्या खालच्या भागात जाऊन फोटो पाठवेल आणि काही अडचण असल्यास समोर आणेल. उस्ताद रोबोटमध्ये हाय डेफिनेशन कॅमेरा असणार आहेत. 320 डिग्री कोनात व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यास हा कॅमेरा सक्षम आहे. सध्या शताब्दी आणि राजधानी सारख्या रेल्वे आपल्या गंतव्य ठिकाणी पोहोचल्यावर याची पूर्ण तपासणी होते. रेल्वेखाली कर्मचारी जाऊन या संदर्भात पूर्ण तपासणी करतो.
आगामी वर्षात देशातील पहिले फाईव्ह स्टार रेल्वे स्थानकही पाहायला मिळणार आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये एअरपोर्टच्या धरतीवर रेल्वे स्थानकही पाहायला मिळणार आहे. हे हॉटेल 10 मजल्यांच होणार असून त्यामध्ये 300 खोल्या असणार आहेत.
रेल्वेमध्ये आतापर्यंत महिला-पुरूष वरीष्ठ नागरीकांना सवलत मिळत होती. पण ही भाडे सवलत आता किन्नरांनाही मिळणार आहे. रेल्वेने सर्व विभागांना यासंदर्भात पत्र लिहिले आहेत. 1 जानेवारी 2019 पासून ही सुविधा सुरू होणार आहे.