Rajya Sabha Election Result : देशातील 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक झाली. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये क्रॉस व्होटिंगच्या वृत्तांनंतर काँग्रेसला अनेक ठिकाणी संकटाला सामोरं जाव लागलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असूनही सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांना पराभवाचा धक्का बसला. तर क्रॉस वोटिंगमुळे अनपेक्षित निकाल देखील समोर आले आहेत. तीन राज्यात राज्यसभेच्या एकूण 15 जागांसाठी मंगळवारी निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजपने एकूण 10 जागा जिंकल्या आहेत. तर 12 राज्यांतील 41 राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, सध्या चर्चेत असलेलं क्रॉस वोटिंग प्रकरण असतं तरी काय? पाहुया सविस्तर
क्रॉस वोटिंग म्हणजे काय असतं?
राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे आमदार आपलं मत नोंदवतात. त्याआधी ते विधिमंडळातील पक्षाच्या प्रमुखाला आपलं मत दाखवतात. त्यानंतर आमदार आपलं मत अध्यक्षांकडे सोपवतात. पण जेव्हा जेव्हा एखादा आमदार त्याच्या पक्षाच्या उमेदवाराऐवजी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला जो आपल्यासोबत युतीमध्ये नाही, अशा उमेदवाराला मतदान करतो तेव्हा त्याला क्रॉस व्होटिंग म्हणतात. 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील आमदारांनी केल्याचं समोर आलंय. त्याचा फटका काँग्रेस आणि भाजपविरोधी पक्षाला बसल्याचं स्पष्ट दिसून आलंय.
क्रॉस वोटिंगला पक्षांतर विरोधी कायदा लागू होतो का?
जर कोणत्या आमदाराने क्रॉस वोटिंग केलीये, याची माहिती पक्षाला असेल तर पक्ष नक्कीच आमदारावर कारवाई करतो. 2022 च्या निवडणुकीत याचे अनेक उदाहरणं पहायला मिळाली आहेत. मात्र, क्रॉस वोटिंगमध्ये पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही. पक्षाचा राजीनामा न देता दुसऱ्या पक्षात सामील झाल्याशिवाय पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही.
क्रॉस वोटिंगची फायदा कोणाला?
यूपीमध्ये राज्यसभा निवडणुकीत आणि हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस वोटिंगचा फायदा भाजपला झाल्याचं दिसून आलं. तर कर्नाटकामध्ये काँग्रेसने भाजपचा गेम केला. भाजपचे आमदार एसटी सोमशेखर यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केलं. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. तर उत्तर प्रदेशात वेगळंच गणित दिसून आलं. यूपीमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच सपाचे आमदार मनोज कुमार पांडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर यूपीमध्ये सपाच्या 7 आमदारांनी एनडीएला मतदान केलं. त्यामुळे भाजपला युपीमध्ये घवघवीत यश मिळाल्याचं पहायला मिळतंय.