'मी, माझी 7 वर्षांची लेक...', सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी; CM चं नाव घेत म्हणाल्या...

Nagpur News : राज्याच्या राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या अनेक घडामोडींमध्येच एका गोष्टीनं पुन्हा एकदा राजकारणाची नकोशी बाजू समोर आणली आहे.   

सायली पाटील | Updated: Dec 17, 2024, 09:07 AM IST
'मी, माझी 7 वर्षांची लेक...', सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी; CM चं नाव घेत म्हणाल्या...  title=
nagpur news Shivsena thackarey party spoksperson Sushma Andhare got detah threat on airport when she was with her daughter

Nagpur News : विधानपरिषदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. चर्चा, प्रस्ताव, गदारोळ अशा कैक गोष्टी एकाच वेळी सुरू असताना आता एक गंभीर वृत्त समोर आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. खुद्द सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करत हा दावा केला. 

नागपूर विमानतळावर एका व्यक्तीनं धमकी दिल्याचा उल्लेख सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये केला. सदरील घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी ही पोस्ट लिहिली असून त्यांनी वस्तुस्थिती तपासावी, अशी विनंतीदेखील अंधारेंनी केली. आपली 7 वर्षांची लेक सोबत असतानाच हा सर्व प्रकार घडल्याचं सांगत त्यांनी त्यावेळी नेमकं काय घडलं याचं सविस्तर वर्णन केलं. 

अंधारेंनी लिहिलं... 

'परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालु आहे. अशातच आत्ता 3 वाजून 36 मिनिटांनी नागपूर विमानतळावर departure gate ला विचित्र घटना घडली. 
मी, माझी 7 वर्षांची लेक आणि समता सैनिक दलाच्या ऍड. स्मिता कांबळे यांच्या समवेत होते. साधारण 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणुन वर बघितले तर तो जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. 
गेट वरील सुरक्षा रक्षक थोडे पुढें सरसावले तसा तो जय श्रीराम च्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला. 
देवेंद्र जी, आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खुपदा वाटले. माञ दहशत आणि दबावतंत्राचे हे गलिच्छ राजकरण मुख्यमंत्री म्हणुन आपल्यापर्यंत पोचवणे ही नागरिक म्हणुन माझी जबाबदारी आहे असे वाटले.'

हेसुद्धा वाचा : Shocking News : परदेशातील रेस्तराँमध्ये एकाच वेळी एकाच खोलीत 12 भारतीयांचा मृत्यू; खरं कारण खळबळजनक...

घटनाक्रम सांगताना अंधारे यांनी आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला जाऊ नये यासाठी शासनाला उद्देशून एक टीपही दिली. शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही. कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही. बाकी आपली मर्जी.... असं त्या पोस्टच्या माध्यमातून स्पष्टच म्हणाल्या.