राज्यसभेत मार्शल नव्हे कमांडो आणून सरकारची दडपशाही - संजय राऊत

Parliament Monsoon Session : राज्यसभेत गोंधळानंतर मार्शल बोलावून खासदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. यावरुन आता विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.  

Updated: Aug 12, 2021, 10:34 AM IST
राज्यसभेत मार्शल नव्हे कमांडो आणून सरकारची दडपशाही - संजय राऊत title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली :  Parliament Monsoon Session : राज्यसभेत गोंधळानंतर मार्शल बोलावून खासदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. यावरुन आता विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. राज्यसभेत  (Rajya Sabha) मार्शल नव्हे कमांडो आणून दडपशाही करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर केला आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संताप व्यक्त करत 55 वर्षांच्या संसदीय राजकारणात असे कधी पाहिलेले नाही, असे ते म्हणाले होते. (Sanjay Raut's allegations against the central government)

शरद पवार यांचा मोठा गंभीर आरोप

राज्यसभेत काल अभूतपूर्व गोंधळ झाला. ओबीसी आरक्षण संशोधन विधेयक पास झाल्यावर सरकारने विमा विधेयक सादर केल्याने विरोधकांनी गदारोळ सुरू केला. सभापतींच्या दिशेने विरोधी बाकांवरून कागद फेकले गेले. त्यामुळे मार्शलना बोलवावे लागले. 40 ते 50 मार्शल बोलावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अनेक खासदारांना यामुळे दुखापत झाल्याचा आरोपही विरोधी खासदारांकडून करण्यात आला आहे. 
 
राज्यसभेत विधेयकावर चर्चा सुरु होती. मात्र, केंद्र सरकारकडून दडपशाही करण्यात आली आहे. चांगल्या वातावरणात चर्चा सुरु होती. काही बिलावर उद्या चर्चा करण्याबाबत विरोधक आग्रही होते. मात्र, सरकार मांडण्यात आलेली विधेयक रेडून नेण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी विरोध करणाऱ्या खासदारांना बाहेर काढण्यात आले. राज्यसभेत मार्शल नव्हे कमांडो आणून दडपशाही करण्यात आली, असे आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

दरम्यान, राज्यसभेतल्या गोंधळानंतर आज रणनीती ठरणार आहे. आज विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक होत आहे. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी होत आहे. त्यानंतर पुढील रणनीत ठरणार आहे.

त्याआधी पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. मी माझ्या 55 वर्षांच्या संसदीय राजकारणात असे काही पाहिले नाही. आमच्या पुरुष खासदारांना रोखण्यासाठी महिला मार्शलचा वापर केला जात आहे. तर महिला खासदारांना रोखण्यासाठी पुरुष मार्शलचा वापर केला जात आहे, असा गंभीर आरोप शरद पवार  (Sharad Pawar) यांनी केला आहे. राज्यसभेत महिला खासदारांवर ज्याप्रकारे हल्ले झाले ते मी पाहिले नाही. 40 पेक्षा जास्त पुरुष मार्शल आणि महिला मार्शल बाहेरून सभागृहात आणले गेले. हे अतिशय दुःखद आणि वेदनादायक आहे, हा लोकशाहीवर हल्ला आहे, असे शरद पवार  (Sharad Pawar) म्हणाले.