'मी हवनात आहुती देईन', नक्कल केल्याने उपराष्ट्रपती व्यथित; सभागृहात मांडली व्यथा

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्याने राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रचंड व्यथित झाले आहेत. संसदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर त्यांनी आपली व्यथा मांडली.   

शिवराज यादव | Updated: Dec 20, 2023, 04:18 PM IST
'मी हवनात आहुती देईन', नक्कल केल्याने उपराष्ट्रपती व्यथित; सभागृहात मांडली व्यथा title=

संसदेच्या आवारात उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवण्यात आल्याने राजकारण तापलं आहे. मंगळवारी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यासाठी बसलेल्या या खासदारांना एक दिवस आधी निलंबित करण्यात आलं होतं. यांच्यात उभे असणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी यावेळी राज्यसभेच्या सभापतींची खिल्ली उडवली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड फार व्यथित झाल्याचं दिसलं. जेव्हा सभागृहाचं कामकाज सुरु झालं तेव्हा त्यांनी आपली व्यथा बोलून दाखली. त्यांनी आपण अपमान पचवत आहे असं म्हटलं. 

'मी हवनात स्वत:ची आहुती देईन'

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड म्हणाले की, "माझी जात आणि शेतकऱ्याचा अपमान केला आहे. हे फार अशोभनीय आहे की, एक खासदार नक्कल करत आहे आणि दुसरा त्याचा व्हिडीओ शूट करत आहे. व्हिडीओ शूट करुन तो सगळ्यांना पाठवण्यात आला. यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचं मौन स्पष्ट दिसत आहे. मी हा अपमान पचवत आहे. मी हवनात आहुती देईन". राज्यसभेत आपलं म्हणणं मांडत असताना जगदीप धनखड भावूक झाल्याचं दिसलं. 

मल्लिकार्जून खर्गे यांचा पलटवार

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विधानावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पलटवार केला. मी दलित असल्याने बोलायला दिलं जात नाही का? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. ते म्हणाले की, "ते नक्कल काढण्याला आपल्या जातीशी जोडत आहेत. मी दलित असल्याने बोलायला दिलं जात नाही असं म्हटलं तर. सभागृहात माझ्या जातीच्या लोकांसोबत असंच झालं आहे. आज आम्हाला लोकांना पुन्हा बोलू दिलं नाही. आम्ही सर्वांनी सभात्याग केला आहे". 

कल्याण बॅनर्जी यांनी दिलं स्पष्टीकरण

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल करणारे टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, नक्कल ही एक कला आहे. तसंच यासह त्यांनी म्हटलं आहे की,  "मी उपराष्ट्रपतींचा अपमान केलेला नाही. मी त्यांचं सन्मान करतो. माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. धनखड फार वरिष्ठ आहेत. मला माहिती नाही त्यांनी इतकं का मनाला लावून घेतलं आहे. मला त्यांना विचारायचं आहे की, इतकं मनाला लावून घेत असतील तर ते खरचं तसे वागतात का?". 

पंतप्रधान मोदींनी फोनवरुन साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडे दु:ख व्यक्त केलं. उपराष्ट्रपती सचिवालयाने एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला होता. त्यांनी संसदेच्या पवित्र आवारात काही माननीय सदस्यांनी केलेली अपमानजक नक्कल प्रकरणी दु:ख व्यक्त केलं. आपण स्वत: गेल्या 20 वर्षांपासून अशा प्रकारचा अपमान सहन करत आहे. पण देशाच्या उपराष्ट्रपतींसारख्या पदावरील व्यक्तीसोबत असं होणं दुर्भाग्यपूर्ण आहे".