Raksha Bandhan 2024: रक्षा बंधन हा हिंदु धर्मातील पवित्र सणांपैकी एक आहे. आज देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. ज्यात बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधेल आणि भाऊ तिला आयुष्यभर सुरक्षेच वचन देईल आणि सोबत गिफ्टपण देईल. पण भारतात असंही एक गाव आहे जिथे भावांची मनगटे दरवर्षी रिकामी राहतात. गेली अनेक वर्षे इथे रक्षाबंधन साजरे झाले नाही. कारण इथल्या भावांच्या मनात एक भीती आहे. ही भीती त्यांना रक्षाबंधन साजरे करण्यापासून रोखते. काय आहे हा प्रकार? कुठे सुरु आहे? जाणून घेऊया.
रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ बहिणीला छानसं गिफ्ट देतो. अनेक बहिणी आपल्या आवडीच्या गिफ्टसाठी हट्ट करतात. पण बहिणीच्या गिफ्टमुळे आपल्याला घर सोडावं लागू नये, ही भीती इथल्या गावकऱ्यांच्या मनात पुर्वीपासून खोल रुजली आहे. याविरुद्ध आवाजही उठवण्यात आला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बहिणी रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून अशी गोष्ट मागेल जी भाऊ देऊ शकत नाही, या विचाराने भाऊ आपले मनगट रितेच ठेवतो.
भारतामध्ये सण उत्सव फार वर्षांपासून सुरु आहेत. वर्षानुवर्षे आपण मोठ्या उत्साहात हे सण साजरे करतो. पण काही गोष्टी अशा घडतात, ज्याची पुढे प्रथाच पडून जाते. आपण आज उत्तर प्रदेशातील बेनीपूर गावाबद्दल जाणून घेऊया. आज देशभरात रक्षाबंधन साजरा होत असेल पण याला बेनीपूर हे गाव अपवाद ठरेल. या गावात हा सण साजरा होत नाही. 'अमर उजाला'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
बहिणींनी ओवाळणीत ती गोष्ट मागितली तर भावांना गाव सोडून जावे लागू शकते, असे त्यांना वाटते. आता हे प्रकरण समजून घेऊ. बेनीपूरचे गावकरी फार आधी अलीगढच्या अतरोलीतील सेमराईमध्ये राहत होते. या गावात यादव आणि ठाकूर समाजाची संख्या मोठी होती. असं असलं तरी यादव समाजाकडे इथली जमीनदारी होती. असं असलं तरी दोन्ही समाजात घनिष्ठाचे संबंध होते.
खरं प्रकरण पुढे सुरु होतं. गावातील जुनी मंडळी सांगतात त्यानुसार, ठाकूर परिवारात अनेक पिढ्यांमध्ये मुलगाच जन्माला आला नाही. त्यामुळे ठाकूर परिवारातील एका मुलीने यादव परिवारातील एका मुलाला राखी बांधली. त्यांनी ही प्रथा कायम ठेवली. दरवर्षी रक्षाबंधनचा सण हे भाऊ बहीण साजरे करु लागले. पण एकदा ठाकूरांच्या मुलीने जमीनदाराच्या मुलाला राखी बांधली आणि गिफ्टमध्ये जमीनदारी मागितली. यानंतर त्या जमीनदाराने त्याच दिवशी गाव सोडण्याचा निर्णय घेतला.
ठाकूरची मुलगी आणि गाववाल्यांनी त्या यादव जमिनदाराला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने काही ऐकले नाही. यानंतर तो जमिनदार आपल्या परिवार आपल्या कुटुंब आणि समाजाला घेऊन संभळ येथील बेनीपूर गावात येऊन राहू लागला. बेनीपूर गावात यादव समाज अनेक वर्ष राहू लागला. पण त्यांनी मिळून एक निर्णय घेतला की आता ठाकूर परिवाराकडून राखी बांधून घ्यायची नाही. येथे यादव समाजात मेहर आणि बकिया गौत्र आहे. या गौत्रातील यादव रक्षाबंधन साजरी करत नाहीत, अशी माहिती गावातील रहिवाशी आणि शिक्षकमित्र सुरेंद्र यादव सांगतात.
बेनीपूर गावातील मेहर आणि बकिया गोत्राच्या यादव परिवारात रक्षाबंधन न साजरे करण्याची परंपरा आजही जिवंत आहे. मेहर गोत्राची लोक आजुबाजूची गावे कटौनी, चुहरूपर, महोरा लखपूरा, बडवाली मढैया बेनीपूर चके रहिवाशी जबर सिंह यादव सांगतात.त्यांचे परिवार देखील रक्षाबंधन साजरे करत नाहीत. तेदेखील वर्षानुवर्षे चालत आलेली जुनी परंपरा पाळतात.