RBI on scrapping Rs 500 notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत 2000 च्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर चलनात आलेल्या या नोटा इतक्या लवकर बाद करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यातच आता आता 500 च्या नोटाही चलनातून बाद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसंच 1000 रुपयांच्या नोटा नव्याने बाजारात आणल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे. यावर आरबीआयनेही स्पष्टीकरण दिलं आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली.
शक्तिकांत दास यांनी 500 च्या नोटा बाद करण्याची किंवा 1000 च्या नोटा नव्याने बाजारात आणण्याची कोणतीही योजना नाही सांगत दावा फेटाळला आहे. तसंच त्यांनी लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. "आरबीआय 500 च्या नोटा बाद करण्याचा किंवा 1000 च्या नोटा पुन्हा आणण्याचा विचार करत नाही आहे. लोकांनी अंदाज लावू नयेत अशी विनंती आहे ," अशी माहिती शक्तिकांत दास यांनी FY24 साठी दुसऱ्या द्वि-मासिक चलनविषयक धोरणाचे अनावरण केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
2000 च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर RBI कडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दरम्यान शक्तिकांत दास यांनी चलनात असणाऱ्या 2000 च्या 50 टक्के नोटा बँकेत जमा झाल्याची माहिती दिली. ही रक्कम एकूण 1 कोटी 82 लाख इतकी आहे.
Post Monetary Policy Press Conference by Shri Shaktikanta Das, RBI Governor- June 08, 2023 https://t.co/vGm4yceiee
— ReserveBankOfIndia (@RBI) June 8, 2023
"2000 रुपयांच्या एकूण 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. नोटा चलानतून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर 2000 रुपयांच्या सुमारे 1.8 लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी हे अंदाजे 50 टक्के आहे," अशी माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे.
परत आलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी 85 टक्के नोटा बँकेत ठेवी म्हणून परत आल्या आहेत, तर उर्वरित नोटा बदलण्यासाठी आहेत असंही शक्तिकांत दास यांनी सांगितलं.
आरबीआयने 19 मे रोजी चलनातील सर्वाधिक मूल्य असणारी 2000 ची नोट चलनातून बाद करत असल्याची घोषणा केली. दरम्यान, यावेळी त्यांनी या नोटा सध्या व्यवहारात वापरल्या जाऊ शकतात असंही स्पष्ट केलं आहे. नोटा जमा करण्यासाठी लोकांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. एकावेळी 20 हजारांपर्यंतची रक्कम बँकेत जमा केली जाऊ शकते.