ज्याची भीती होती तेच झालं - शर्मिष्ठा मुखर्जी

शर्मिष्ठा यांनी आपल्या वडिलांना आरएसएसच्या कार्यक्रमात जाण्यास विरोध दर्शवला होता

Updated: Jun 8, 2018, 09:44 AM IST
 ज्याची भीती होती तेच झालं - शर्मिष्ठा मुखर्जी

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी तसंच काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी 'ज्याची भीती होती तेच झालं, भाजपा / आरएसएसचं डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंटनं तेच केलंय' असं म्हणत आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केलाय. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बुधवारी संघाच्या व्यासपीठावर उपस्थित होते... यावेळच्या त्यांच्या फोटोमध्ये छेडछोड करण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. 

सोशल मीडियावर दिसणाऱ्या काही फोटोंत प्रणव मुखर्जी संघ नेते आणि कार्यकर्त्यांप्रमाणे अभिवादन करताना दिसत आहेत... परंतु, प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळं होतं. यावर शर्मिष्ठा यांनी निशाणा साधलाय. 

शर्मिष्ठा यांनी आपल्या वडिलांना आरएसएसच्या कार्यक्रमात जाण्यास विरोध दर्शवला होता... सोशल मीडियावरूनही त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. 

शर्मिष्ठा यांचा सूचना वजा सल्ला

माजी राष्ट्रपतींचा हा दौरा 'भगव्या विचारधारेला प्रोत्साहन' देण्यासारखंच असल्याचं शर्मिष्ठा यांनी म्हटलं काल सोशल मीडियावर म्हटलं होतं. नागपुरात जाऊन तुम्ही भाजप / आरएसएसला खोट्या कहाण्या रचण्यासाठी खुली सूट देत आहात, असा सूचना वजा सल्लाही शर्मिष्ठा यांनी आपल्या वडिलांना आधीच दिला होता. 'तुम्ही त्यांच्या विचारांना प्रोत्साहन द्याल, यावर खुद्द आरएसएसचाच विश्वास नाही... लोक भाषण विसरून जातील पण फोटो मात्र नेहमीसाठीच राहतील आणि त्यांना चुकीच्या वक्तव्यांसहीत पसरवलं जाईल' असं त्यांनी आपलं ट्विटमध्ये म्हटलं होतं.

संघाला मुखर्जींकडून 'बौद्धिक'

बुधवारी नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपिठावरून बोलताना द्वेष, हिंसेकडून शांततेकडे जायला हवं असं आवाहन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं. सुखी, आनंदी आयुष्य प्रत्येकाचा हक्क आहे. आनंदाच्या निर्देशांकात भारत मागे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात सरसंघचालक सर्वात शेवटी बोलतात. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी या प्रथेमध्ये बदल करण्यात आला.