Sadhguru Ashram : मागील काही वर्षांमध्ये अध्यात्मिक मार्गाची निवड करत त्या मार्गाचे वाटसरु होण्याकडे अनेकांचाच कल दिसून आला. याच निमित्तानं काही अध्यात्मिक गुरुंचीही नावं पुढे आली आणि त्यांच्या अनुयायांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली. अशाच गुरुंपैकी एक असणाऱ्या सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या आश्रमाविषयीची एक खळबळजनक माहिती नुकतीच समोर आली आहे.
तामिळनाडू पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयात सद्गुरुंच्या ईशा फाऊंडेशनविरोधातील याचिकेला आव्हान देणाऱ्या याचिकेत खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. जग्गी वासुदेव यांच्या आश्रमात गेलेले बरेचजण बेपत्ता असून, त्यांचा पोलिसांना आजतागायत शोध लागला नाही, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
सदर याचिकेत पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ईशा फाऊंडेशनच्याच परिसरामध्ये एक स्मशानभूमी आहे. शिवाय इथं असणाऱ्या रुग्णालयातून अशी औषधं दिली जात होती, ज्यांची वापरासाठीची मुदत संपुष्टात आली होती. सदर प्रकरणात कोईंबतूर पोलिसांनीही सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्याविरोधात काही गुन्ह्यांची नोंद केली आहे.
सद्गुरुंविरोधातील या माहितीनुसार तक्रारीमध्ये एका 23 पानी अहवालाचा समावेश असून, त्यामध्ये इथं विविध प्रशिक्षण आणि उपक्रमांसाठी आलेल्या आणि अचानकच बेपत्ता झालेल्या अनुयायांचाही संदर्भ आहे. कोईंबतूर जिल्हा पोलीस निरीक्षक के. कार्कितेयन यांनी पुढाकार घेत ही बाब प्रकाशात आणली. ज्यामध्ये मागील 15 वर्षांमध्ये ईशा फाऊंडेशनमधील 6 जण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असल्याचाही मुद्दा अधोरेखित केला.
अहवालातील माहितीनुसार सहापैकी पाच प्रकरणांना पुढील तपासाअभावी पूर्णविराम देण्यात आला आहे, पण एक प्रकरण मात्र तपासाधीस असून बेपत्ता व्यक्तीसंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कलम 174 अंतर्गत 7 गुन्हे दाखल असून, त्याचा संबंध आत्महत्यांशी असल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार ईशा फाऊंडेशनच्या शेजारी राहणाऱ्यांकडून इथं बांधलं जाणारं स्मशान हटवण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. पण, यावर अद्याप कोणताही निकाल लागला नसून, हे स्मशान सध्या वापरात आहे. फक्त इतकंच नव्हे, तर पोक्सो अंतर्गत काही गुन्ह्यांची नोंदही करण्याल आली असून, महिला, आहार आणि ईशा फाऊंडेशनमधील आरोग्यविषयक सुविधांसंदर्भात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या.