'सनातन धर्म पूर्णपणे संपवला पाहिजे'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुलाचे विधान

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरियाशी तुलना करून वाद निर्माण केला आहे. आपण कोणत्याही कारवाईसाठी तयार आहोत असा इशाराही उदयनिधी स्टॅलिन यांनी दिला आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 3, 2023, 08:57 AM IST
'सनातन धर्म पूर्णपणे संपवला पाहिजे'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुलाचे विधान title=
(फोटो सौजन्य - ANI)

तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. मलेरिया आणि डेंग्यूसारखे सनातन धर्माचे वर्णन करून त्याला विरोध करू नये, तर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. उदयनिधी यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद उद्धभवण्याची शक्यता आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांसह अनेकजण सोशल मीडियावर निषेध नोंदवत आहेत.

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना केवळ रोगाशीच केली नाही तर त्याला पूर्णपणे नष्ट करण्याबाबतही सांगितले आहे.  तामिळनाडूमध्ये सनातन निर्मूलन परिषद आयोजित करण्यात आली होती ज्यात उदयनिधी स्टॅलिन सहभागी झाले होते. या परिषदेशी संबंधित एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात ते सनातन धर्म नष्ट करण्याबाबत बोलत आहेत. सनातन धर्माला केवळ विरोध करू नये. त्यापेक्षा तो संपवून टाकला पाहिजे,  असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले उदयनिधी स्टॅलिन?

"मला भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मी या परिषदेच्या आयोजकांचे आभार मानतो. तुम्ही संमेलनाला 'सनातन विरोधी संमेलन' ऐवजी 'सनातन निर्मूलन परिषद' असे नाव दिले आहे, त्याचे मला कौतुक वाटते. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संवपून टाकल्या पाहिजेत. डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला आपण विरोध करू शकत नाही, त्याचा नायनाट करायचा आहे. त्याचप्रमाणे सनातनला विरोध करून संपवायचे आहे. सनातन हे नाव संस्कृतमधून आले आहे आणि त्याचा अर्थ स्थिर आणि अपरिवर्तित असा आहे. सर्व काही बदलावे लागेल. पण हे सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे," असे उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर विरोध असल्याचे पाहून उदयनिधी यांनी त्यांच्या एक्सवरुन (पूर्वीचे ट्विटर) प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणत्याही कायदेशीर आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे, असे स्टॅलिन म्हणाले. "आम्ही अशा सामान्य भगव्या धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही पेरियार, अण्णा आणि कलैगनार यांचे अनुयायी आहोत. सामाजिक न्याय राखण्यासाठी आणि समतावादी समाजाची स्थापना करण्यासाठी नेहमीच लढा देऊ. मी आज, उद्या आणि सदैव हेच सांगेन, द्राविड भूमीतून सनातन धर्म बंद करण्याचा आपला संकल्प थोडाही कमी होणार नाही," असे उदयनिधी म्हणाले.