देशात लोकशाहीचा खून, राजकीय सुडातून विरोधकांना नोटीसा - संजय राऊत

​Sanjay Raut  On ED Notice : देशात लोकशाहीचा खून होत आहे, भाजपने स्वातंत्र्याचा पराभव केलाय, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राजकीय सुडातून विरोधकांना नोटीसा येत असल्याची टीका त्यांनी केली.  

Updated: Jun 15, 2022, 12:21 PM IST
देशात लोकशाहीचा खून, राजकीय सुडातून विरोधकांना नोटीसा - संजय राऊत title=

अयोध्या : Sanjay Raut  On ED Notice : देशात लोकशाहीचा खून होत आहे, भाजपने स्वातंत्र्याचा पराभव केलाय, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राजकीय सुडातून विरोधकांना नोटीसा येत असल्याची टीका त्यांनी केली. राज्यसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाशी राज्यातून कोण कोण बोलत होते याची माहिती आमच्याकडे आहे, असे राऊत म्हणाले. काँग्रेस खासदार राहुल गांधी, मंत्री अनिल परब यांना राजकीय सुडापोटी ईडीच्या नोटिसा पाठविण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला.

राज्‍यसभा निवडणुकीवेळी मुंबईतून तो फोन कोणी केला, हे आम्हाला माहित आहे. राज्‍यसभा निवडणुकीत सुहास कांदे यांचे मत बाद केले गेले. त्‍यांचे मत बाद करा, असा अआदेशच दिल्‍लीतून आला. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्लीतून कोणी फोन केले, हे आम्हाला माहित आहे. राज्यसभा निवडणुकीत वाईट राजकारण झाले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

भाजपकडून त्रास दिला जात आहे. केंद्र सरकारवर टीका करणार्‍या लोकांना केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देत आहे. देशातील कोणती यंत्रणा स्वतंत्र आहे? याचा शोध घेतला पाहिजे. हे सर्व राजकीय द्वेषापोटी  घडत आहे. विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजप करत आहे. हिटलरनेही असे काम केलेल नाही, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.

अयोध्येशी आमचे भावनिक नाते - विनायक राऊत

हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. अयोध्येशी आमचे भावनिक नाते आहे. यापूर्वी अनेकदा आम्ही इथं आलोय. त्यामुळं आम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली. आतापर्यंत केंद्रिय यंत्रणाचा इतका गैरवापर कधीच झाला नव्हता. त्यातूनच अनिल परब  यांना नोटीस पाठवली गेलीय. परंतु यामुळं शिवसेना दबणार नाही,तर उलट फोफावून उठेल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील विजयाने याचे उत्तर मिळेल.  त्या महंत यांना राज्यातील हनुमान चालिसा प्रकरण माहिती नसेल. आमचा हनुमान चालिसा वाचायला अजिबात विरोध नाही. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे बीज रोवले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात त्याचा वटवृक्ष झालेला पहायला मिळतोय, असे ते म्हणाले.

 महाराष्ट्राला दाबण्याचा प्रयत्न - अनिल देसाई 

केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्राला दाबण्याचा प्रयत्न होतोय. तो होवू दिला जाणार नाही. शिवसेना,हिंदुत्व आणि अयोध्या हे एक भावनिक नाते आहे. सध्या अनेकजण हिंदुत्वाशी नाते सांगायचा प्रयत्न करत आहेत. हनुमानगढीच्या महंतानाही केंद्रीय यंत्रणेची एखादी नोटीस आली असेल म्हणून ते तसं बोलत असतील, असे अनिल देसाई  म्हणाले.