तुम्ही निर्दयी आणि अकार्यक्षम आहात; SBI च्या अध्यक्षांची अर्थमंत्र्यांकडून खरडपट्टी

 या कामासाठी आठवडाभराचा अवधी लागेल, असे त्यांनी सांगितले.

Updated: Mar 15, 2020, 02:40 PM IST
तुम्ही निर्दयी आणि अकार्यक्षम आहात; SBI च्या अध्यक्षांची अर्थमंत्र्यांकडून खरडपट्टी title=

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेचे बिरुद मिरवणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा (SBI) कारभार निर्दयी आणि अकार्यक्षम असल्याचे खडे बोल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेच्या उच्चपदस्थांना सुनावले. २७ फेब्रुवारी रोजी गुवाहाटीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान निर्मला सीतारामन यांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या भाषणाची ऑडिओ क्लीप आता समोर आली आहे. 

या क्लीपमध्ये आसाममध्ये चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या अडीच लाख मजुरांची बँक खाती बंद केल्याच्या मुद्द्यावरून सीतारामन बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांची खरडपट्टी काढताना ऐकायला मिळत आहे. ही बँक खाती पुन्हा सुरु करण्यासाठी किती कालावधी लागेल, असा प्रश्न सीतारामन यांनी बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांना विचारला. त्यावर रजनीश कुमारांनी यासाठी रिझर्व्ह बँकेकडून (RBI) काही परवानग्या मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले. या कामासाठी आठवडाभराचा अवधी लागेल, असेही त्यांनी म्हटले.

रजनीश कुमार यांच्या उत्तरावर निर्मला सीतारामन प्रचंड संतापल्या. तुम्ही माझा अंत पाहू नका. एसबीआयचे अध्यक्ष तुम्ही यासाठी मला दिल्लीत येऊन भेटा. हा मुद्दा मी असाच सोडून देणार नाही. हा कामातील बेजबाबदारपणा आहे. या अपयशासाठी तुम्हीच जबाबदार आहात. दिल्लीत या, आपण यावर सविस्तर बोलू. तुम्ही मजुरांची खाती सुरु करायला पाहिजेत. तुमच्या या आडमुठ्या कारभारामुळे मजुरांचे नुकसान होता कामा नये, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले. यावेळी व्यासपीठावर आसामचे अर्थमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्यासह केंद्रातील अनेक महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

सीतारामन यांच्या या वक्तव्याचा ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन (एआयबीओसी) असोसिएशनने निषेध केला आहे. हा देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या प्रमुखांचा अपमान आहे. एवढेच नव्हे हे बोलणे ठरवून रेकॉर्ड करून व्हायरल करण्यात आले. बँकेच्या उच्चपदस्थांशी अशाप्रकारे वागणे हे योग्य नाही, असे 'एआयबीओसी'ने म्हटले आहे.