Cyber Crime: इंटरनेटचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे तोटेही आहेत. इंटरनेटच्या या आभासी जगात आपण एकमेकांच्याजवळ आलोय पण आपण कोणाशी नेमके बोलतोय हे आपल्याला माहिती नसतं. सायबर गुन्हेगार नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन लाखोंची फसवणूक करतात. अशाच एका घटनेत एका लग्नाळू तरुणाला कोट्यावधींचा फटका बसला आहे. डेटिंग साइडवरुन हा घोटाळा झाला आहे.
डेटिंग साइडचा गैरफायदा घेऊन नुकतेच एका महिलेने पुरुषाला ब्लॅकमेल करून 1.1 कोटी रुपयांना लुटले. एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून तरुण आणि तरुणीची ओळख झाली. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणाने तिच्याशी बोलणी वाढवायला सुरुवात केली. पीडित तरुण हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून यूकेचा रहिवासी आहे. तो बंगळुरूला अधिकृत कामासाठी आला होता.
तक्रारदार तरुण लग्न करण्याच्या विचारात होता. म्हणून त्याने मॅट्रिमोनियल वेबसाइटवर नोंदणी केली. तिथल्या एका महिलेला तो भेटला आणि दोघांनी नंबरची देवाणघेवाण केली. दोघांचे बोलणे सुरू झाले. दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. मी माझ्या आईसोबत राहते, असे तिने सांगितले. तसेच महिलेने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यानंतर खरा खेळ सुरू झाला. 2 जुलै रोजी महिलेने आईच्या प्रकृतीचे कारण देत 1500 रुपये उधार मागितले. मग 4 जुलैचा दिवस आला. महिलेने त्याला व्हिडिओ कॉल केला आणि तिचे सर्व कपडे काढले. महिलेने संपूर्ण व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला. कॉल केल्यानंतर, महिलेने त्या व्यक्तीला स्क्रिन शॉट्स पाठवले आणि त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पैसे दे नाहीतर तुझ्या पालकांना ही क्लिप शेअर करेल, अशी धमकी द्यायला तिने सुरुवात केली. त्यानंतर तरुणानदोन वेगवेगळ्या बँक खात्यांवर आणि महिलेने दिलेल्या चार फोन नंबरवर 1 कोटी 14 लाख रुपये पाठवले.
पैसे पाठवताना त्या व्यक्तीला महिलेचे खरे नाव कळले. त्यानंतरही संबंधित महिलेने ब्लॅकमेलिंग सुरुच ठेवले. अखेर तरुणाने पोलिसांशी संपर्क साधला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.
आरोपीने लोकांकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने बनावट नावाने प्रोफाइल तयार केल्याचे पोलिसांनी सांगितले. लाभार्थ्यांच्या खात्यातील सुमारे 84 लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले असून महिलेने आधीच 30 लाख रुपये वापरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.