मुंबई : कोरोना महामारीची दुसरी लाट पहिल्यापेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचे सिद्ध होत आहे. दुसर्या लाटेमध्ये दररोज 20 हजारांवरून एक लाखांवर कोरोना रुग्णांची संख्या पोहोचण्यास अवघे 25 दिवसांचा कालावधी लागला, तर पहिल्या लाटेमध्ये यासाठी 76 दिवसांचा कालावधी लागला होता.
देशातील आठ राज्यांमध्ये सर्वाधिक संसर्ग होत आहे. जवळपास 82 टक्के प्रकरणे या राज्यांमधून समोर आली आहेत. यापैकी महाराष्ट्र सर्वात चिंतेचे कारण आहे, जिथे जवळजवळ दररोज 50 टक्के पेक्षा जास्त नवीन रुग्ण वाढत आहेत.
सोमवारी सकाळी आठ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 1,03,558 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्याच्या 10 तारखेला 20 हजार नवीन प्रकरणे आढळली होती. 25 दिवसांत ही संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. यापूर्वी 17 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 97,894 रुग्ण आढळले होते. एकूण संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आता 1.26 कोटींच्या जवळपास पोहोचली आहे.
आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि पंजाब येथे संसर्ग झपाट्याने वाढत आहे. एक लाख नवीन रुग्णांपैकी 81.90 टक्के रुग्ण या राज्यांमधील आहेत.
सलग 25 दिवसांपासून सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. सध्या, सक्रिय रुग्णांची संख्या 7,41,830 वर पोहोचली आहे, जी एकूण संक्रमित लोकांपैकी 5.89 टक्के आहे. 24 तासांत 50,233 सक्रिय रुग्ण वाढले आहेत. केवळ महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ आणि पंजाबमध्ये 75.88 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. यापैकी एकट्या महाराष्ट्रात 58.23 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत.
जवळजवळ 1.17 कोटी लोकांची कोरोनावर मात
सरकारच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 82 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. शेवटच्या एका दिवसात 52 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आणि 478 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 1,65,101 लोकांनी आपला जीव गमावला आहे. रूग्णांचा रिकव्हरी रेट 92.80 टक्के आणि मृत्यूचे प्रमाण 1.31 टक्के आहे.