'या' कॅफेत तुम्हाला कोणी बिल देत नाही !

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 8, 2017, 03:49 PM IST
'या' कॅफेत तुम्हाला कोणी बिल देत नाही !  title=
फोटो सौजन्य: सोशल मिडिया

कॅफेत जाणं म्हणजे मज्जा, मस्ती, धमाल आणि भरमसाठ बिल. अशी सर्वसामान्यांची कल्पना असते. आणि ते अगदी खरं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दररोज कॅफेत जाणं जमत नाही. कारण एकदा गेल्यावर खिसा चांगलाच रिकामा होतो. परंतु, असा एक कॅफे आहे ज्यात तुम्हाला बिल भरावं लागत नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या कॅफेला नफा नेमका कशातून मिळतो किंवा हा व्यवसाय नेमका कसा चालतो? तर सगळेच लोक पैशाच्या मागे धावत नाहीत. तर काहीजण पैशासाठी न जगता इतरांच्या आनंदासाठी जगत असतात. लोकांची सेवा करणं आणि त्यांना आनंदी बघणं हाच त्यांचा उद्देश असतो. याच सेवाभावी भावनेतून अहमदाबादमधला ‘सेवा कॅफे’ सुरु झाला आहे. 

या सेवा कॅफेमध्ये काही खाल्यानंतर तुम्हाला बिल भरावं लागत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हा कॅफे नेमका चालतो कसा ? तर ‘गिफ्ट इकोनॉमी’ या तत्त्वावर हा कॅफे चालतो. म्हणजे येथे येणाऱ्या ग्राहकाचे पैसे आधीच कोणीतरी भरलेले असतात. आपापल्या परीने प्रत्येकजण येथे पैसे भरतो. त्या पैशातूनच फूड सर्व्ह केलं जातं. प्रत्येक ग्राहक आपल्या मनाने पैसे देतो. पैसे देण्यासाठी कोणावरही जबरदस्ती वा सक्ती केली जात नाही. ‘मानव सदन’, ‘ग्राम श्री’ आणि ‘ स्वच्छ सेवा’ या स्वयंसेवी संस्था मिळून हा कॅफे चालवतात. आणि थोडे थोडके नव्हे तर तब्बल ११ वर्ष हा कॅफे सुरु आहे. 

हा कॅफे गुरुवार ते रविवार संध्याकाळी ७-१० या वेळेत सुरु असतो. या चार दिवसात ५० जण येथे खाऊ शकतात. ५० जणांनी खाल्यानंतरच हा कॅफे बंद केला जातो. कॅफेत येणारे ग्राहक देखील येथे स्वयंसेवक म्हणून काम करतात. ते स्वत:ला ”मूव्ड बॉय लव” म्हणतात. स्वतःहून जमेल तशी वेगवेगळी कामे ते कॅफेमध्ये करत असतात. काम करताना कोणत्याही पगाराची अपेक्षा ठेवली जात नाही.