नवी दिल्ली : शैलजा द्विवेदी... भारतीय सेनेत मेजर पदावर असणाऱ्या एका मेजरची पत्नी आणि 'मिसेस 'चा किताब पटकावणारी सुंदर महिला... तर मेजर निखिल हांडा भारतीय सेनेतील अधिकारी आणि शैलजाचा प्रियकर... शैलजाच्या हत्या प्रकरणात मेजर निखिल हांडा याला पोलिसांनी अटक केलीय. हांडाच्या अटकेनंतर उघड झालेल्या सुंदरता, प्रेम आणि वासनेच्या या रक्तरंजित कहाणीनं अनेकांना हादरवून टाकलं.
शैलजा आणि अमित द्विवेदी यांचा विवाह २००९ मध्ये झाला होता. शैलजाला गाणं, डान्स, जेवण बनवणं आणि बॉलिवूडची गाणी ऐकण्याची आवड होती. ३५ वर्षीय शैलजां 'प्लानिंग'मध्ये एमटेकची डिग्री मिळवली होती. 'मिसेस इंडिया अर्थ' मॅगझीनच्या कव्हर पेजवर गेल्या जुलैमध्ये सर्वात क्रिएटिव्ह महिला म्हणून तिचा फोटोही प्रसिद्ध झाला होता. गुरुनानक देव युनिव्हर्सिटीमध्ये तिनं ५ वर्ष लेक्चरर म्हणूनही काम केलं. 'कॅच अॅन्ड केअर' एनजीओसोबत ती गरीब मुलांना शिकवण्याचंही काम करत होती.
तीन वर्षांपूर्वी २०१५ साली शैलजाची ओळख असलेल्या निखिल हांडा याच्यासोबत झाली होती. निखिल हा विवाहीत असून त्याच्या कुटुंबात पत्नी, दोन मुलं, भाऊ, आई-वडील असे सदस्य आहेत. नागालँडच्या दीमापूरमध्ये शैलजाचे पती अमित यांची पोस्टिंग होती... तिथंच आर्मी ऑफिसर निखिलचीही पोस्टींग होती. दोघेही विवाहीत निखिल आणि शैलजा एकमेकांकडे आकर्षित झाले होते. त्यांच्या मैत्रिननं लवकरच प्रेमाचं रुप घेतलं होतं. पण, लवकरच अमितची ट्रान्सफर झाली आणि शैलजा दिल्लीला शिफ्ट झाली. तर दुसरीकडे निखिलची ट्रान्सफर मेरठला झाली.
परंतु, निखिल मात्र शैलजाला विसरण्यास तयार नव्हता. फोन, व्हिडिओ कॉल, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा संवाद सुरूच होता. निखिलनं शैलजाकडे लग्नासाठी तगादा लावला होता... परंतु, शैलजाला मात्र हे मान्य नव्हतं... मैत्री ठिक आहे परंतु, विवाह करण्यास मात्र तिनं निखिलला साफ नकार दिला.
अमितलाही निखिल आणि शैलजाच्या संबंधांची भनक लागली होती. त्यानं आपली पत्नी शैलजाला निखिलसोबत व्हिडिओ कॉलवर संभाषण करताना एकदा पकडलंही. त्यानंतर त्यानं शैलजाला हे संबंध संपवण्याचा सल्लाही दिला. परंतु, त्यानंतरही निखिल चोरून - लपून शैलजाला फोन करतच होता. शैलजा कधी त्याचा फोन घेत होती तर कधी त्याला टाळत होती. निखिलला समजावण्याचा तिचा प्रयत्न फोल ठरत होता.
या दरम्यान शैलजाच्या पायाला दुखापत झाल्यानं ती डिफेन्सच्या हॉस्पीटलमध्ये फिजिओथेरपीसाठी जात असल्याचं निखिलला समजलंय. शैलजाला गाठण्यासाठी निखिलनं आपल्या मुलाला उपचारासाठीही दिल्ली स्थित त्याच हॉस्पीटलमध्ये दाखल केलं जिथं शैलजा उपचार घेत होती.
एक-दोन प्रयत्न फोल ठरल्यानंतर त्यानं २३ जून रोजी सकाळी १० वाजल्या पासून १ वाजेपर्यंत निखिलनं शैलजाला अनेक फोन केले. अखेर, वैतागलेल्या शैलजानं निखिलला भेटण्यासाठी होकार दिला. अमितची सरकारी गाडी घेऊन शैलजा हॉस्पीटलच्या आवारात दाखल झाली. परंतु, हॉस्पीटलमध्ये न जाता ती जवळच उभ्या असलेल्या निखिलच्या गाडीत बसली... निखिलला तिनं पुन्हा नकार दिल्यानंतर अगोदरपासूनच गाडीत चाकू घेऊन आलेल्या निखिलनं सीटवरच तिचा गळा चिरला.
शैलजाची हत्या केल्यानंतर निखिल हॉस्पीटलला पत्नी आणि मुलाजवळ पोहचला... गाडीत सीटला लागलेल्या रक्ताच्या डागांबद्दल जेव्हा पत्नीनं निखिलला विचारलं तेव्हा त्यानं आपल्या गाडीखाली कुत्रा आल्याची आणि हे कुत्र्याच्या रक्ताचे डाग असल्याची बतावणी केली... इथून निखिल मेरठला निघून गेला.
दुसरीकडे, शैलजाला रिसिव्ह करायला गेलेल्या ड्रायव्हरनं शैलजा हॉस्पीटलमध्ये नसल्याचं अमितला सांगितलं. याच दरम्यान पोलिसांना शैलजाचं प्रेत एका रस्त्याच्या बाजुला आढळलं होतं. अमितनं शैलजा हरवल्याची तक्रार दाखल केली तेव्हा तो मृतदेह शैलजाचाच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांसमोर अमितनं याबद्दल निखिलवर संशय व्यक्त केला होता.
पोलिसांची चौकशी सुरू झाली तेव्हा पहिल्यांदा हॉस्पीटलचं सीसीटीव्ही फुटेज त्यांनी धुंडाळलं. त्यात त्यांना आढळलेल्या गाडीचा शोध घेत ते मेरठला निखिल हांडापाशी पोहचले आणि निखिल हांडाला ताब्यात घेतलं.
पोलिसांच्या चौकशीत गेल्या तीन महिन्यांत निखिलनं शैलजाला ३३०० वेळा फोन केल्याचं समोर आलंय. निखिलच्या पत्नीला आणि मुलालाही या बातमीनं मोठा धक्का बसलाय. परंतु, ही बातमी समजल्यानंतर अनेकांना या बातमीनं हादरवून टाकलं.