मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चक्क काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे. इतकचं नाही तर मोदी लहर फिकी पडल्याचंही म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं की, गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्याच्या विरोधात गुजरातमधील नागरिकांमध्ये राग आहे. म्हणजेच भाजपला निवडणुकीत मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागण्याचं हे एक संकेत आहे. संजय राऊत यांनी एका टिव्ही चॅनलवर हे भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं की, "सोशल मीडियात राहुल गांधी यांची खिल्ली उडवली जाते. मात्र, राहुल गांधी देशाचं नेत्रृत्व करण्यासाठी सक्षम आहे." याच कार्यक्रमात राज्याचे शिक्षणमंत्री आणि भाजपनेते विनोद तावडेही उपस्थित होते.
"देशाची सर्वात मोठी राजनितिक शक्ती जनता आहे, मतदार आहेत." असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपला राऊत यांनी टोला लगावला आहे. दरम्यान, भाजपने २०१४ च्या आगामी निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत बहुमत मिळवलं होतं.
संजय राऊत यांनी पूढं म्हटलं की, "२०१४च्या निवडणुकीत मोदी लहर पहायला मिळाली होती मात्र, आता ही लहर फिकी पडल्याचं दिसत आहे. जीएसटी नंतर गुजरातमधील रस्त्यांवर नागरिक रॅली काढत आहेत त्यामुळे हे पाहता भाजपला आगामी निवडणुकीत आव्हानाचा सामना करावा लागू शकतो." गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.
एनडीएमधील घटक पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनाचं भाजपसोबतचं कोल्ड वॉर गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नेहमीच टीका करत असतात. इतकेच नाही तर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर विविध मुद्द्यांवरुन जोरदार हल्ला चढवला जातो.
गुजरातमध्ये शिवसेनेला कुठलाच आधार नाहीये. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलला पक्षाने समर्थन दिलं आहे. हार्दिक पटेलने उद्धव ठाकरे यांची या वर्षाच्या सुरुवातीला भेट घेतली होती. दरम्यान, २०१५ साली शिवसेनेने म्हटलं होतं की, १०० राहुल गांधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महालहरची बरोबरी करु शकत नाही आणि 'सूट बूट की सरकार' म्हणत राहुल गांधींची खिल्ली उडवली होती.