'महाराष्ट्रातल्या जनतेने साधव व्हावं! किती भाजी आणि चिकन घेता यावरही ईडीची नजर'

देशातील अनेक भाजप शासित प्रदेशात आजही भोंगे आहेत - संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

Updated: Apr 5, 2022, 10:34 AM IST
'महाराष्ट्रातल्या जनतेने साधव व्हावं! किती भाजी आणि चिकन घेता यावरही ईडीची नजर' title=

नवी दिल्ली : तुम्ही भाजीची जुडी जरी विकत घ्यायला गेलात, तरी तुमच्यावर ईडीचं (ED) लक्ष आहे. काल किती चिकन घेतलं आणि आज किती चिकन घेतलं त्यावरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे आणि ताबडतोब ते ईडीला कळवतील. महाराष्ट्रताल्या जनतेने सावध राहिलं पाहिजे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे. 

नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या भोंगा वादावरही प्रतिक्रिया दिली आहे. देशात अनेक राज्यात अजूनही भोंगे उतरलेले नाहीत, तिथल्या हायकोर्टाचे आदेश असूनही अनेक भाजप शासित प्रदेशात आजही भोंगे आहेत. गोव्यातही भाजपचे दहा वर्षांपासून राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्येही भोंगे आहेत तसेच आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट सुचना दिल्या आहेत. त्याचं पालन होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रातले सर्वपक्षीय आमदार आज दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील जे आमदार दिल्लीत उपस्थित आहेत त्या सर्वांना आमंत्रण आहे. सर्वपक्षीय आमदारांना चहापानांचा निमंत्रण असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे भोजन व्यवस्था आहे. आम्ही यजमान आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी असं खेळीमेळीचं वातावरण होतं. ते तसंच राहावं असं आम्हाला वाटतं. विचारांचं आदानप्रदान व्हायला हवं. जे आमदार दिल्लीत आलेले आहेत त्या सर्वांना आमंत्रण आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

नवी दिल्लीत शिवसेना खासदारांची काल बैठक झाली. या बैठकीत शिवसेना खासदारांनी नाराजी व्यक्त करत आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. शिवेसेनेचे राज्यातले मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याविषयी नाराजी व्यक्त करण्यात आलीय. झी 24 तासच्या या EXCLUSIVE बातमीला संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. काही कार्यकर्त्यांकडे पालकमंत्री दुर्लक्ष करत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आहे. सर्व मंत्र्यांनी मदत करायला हवी, आमच्याही कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यायला हवं असं राऊत यांनी सुनावलं. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार पद्धतीने पक्षाच्या कामाला सुरुवात केलेली आहे. पक्षसंघटनेकडे अत्यंत काळजीपूर्वक ते पाहत आहेत. लवकरच प्रमुख पदाधिका, खासदार यांच्या बैठका घेतील. आणि लवकरच ते महाराष्ट्रात फिरायला सुरुवात करतील, असं ही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.