'कॅमेरा चालू करा, मला तुम्हाला सर्वांना', ऑनलाइन क्लास सुरू असतानाच शिक्षिकेने सोडला प्राण

शिक्षिकेसोबतचा तो क्षण ठरला खास 

Updated: Nov 3, 2021, 10:08 AM IST
'कॅमेरा चालू करा, मला तुम्हाला सर्वांना', ऑनलाइन क्लास सुरू असतानाच शिक्षिकेने सोडला प्राण  title=

मुंबई : केरळच्या ऑनलाईन क्लासमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. केरळच्या कासरगोड जिल्ह्यातील कल्लरमधील एका खासगी शाळेतील शिक्षिकेचं ऑनलाईन क्लास दरम्यान निधन झालं आहे. शिक्षिका आपल्या फोनवर ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत होती. शिकवतानाच त्या बेशुद्ध पडल्या. शिक्षिकेची विद्यार्थ्यांना बघण्याची इच्छा अर्धवटच राहिली. 

याबाबत माहिती देताना शिक्षिकेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, गुरुवारी रात्री शासकीय कल्याण निम्न प्राथमिक शाळेतील आडोतुकयामधील शिक्षिका माधवी सी या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत होत्या. शिकवत असताना अचानक माधवीला अस्वस्थता आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला आणि नंतर खोकला सुरू झाला. यावर माधवीने अचानक विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊन वर्ग संपवला. 

काही वेळाने घरी आलेल्या एका नातेवाईकाने माधवी बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेली पाहिली. त्यांनी शिक्षिकेला जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी माधवीला मृत घोषित केले. ऑनलाइन वर्गाच्या रेकॉर्डिंगमध्ये, शिक्षिका विद्यार्थ्यांना सांगतानाही ऐकू येते की पुढील आठवड्यात शाळा पुन्हा सुरू होतील आणि तिला सर्व विद्यार्थ्यांना पाहायचे आहे. वर्गाचे रेकॉर्डिंग आता त्यांच्या नातेवाईक आणि विद्यार्थ्यांसाठी एक खास आठवण बनली आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, शिक्षकाच्या अचानक मृत्यूचे कारण उच्च रक्तदाब असू शकते.

या घटनेने शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला मोठा धक्का बसला आहे. शिक्षिकेचं असं अचानक जाणं हे मनाला चटका लावून गेलं आहे. कोरोनामुळे गेली दीड वर्षे शाळा ऑनलाईन भरत आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट झालेली नाही. माधवी शिक्षिकेची भेट अधुरीच राहिली.