सिगारेटचे व्यसन लावल्यामुळे कॅन्सरग्रस्त तरूणाकडून मित्राची हत्या

वाईट संगतीचा शेवटही किती वाईट असू शकतो, हे दाखवणारा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका २५ वर्षीय कॅन्सरग्रस्त (कर्करोग) तरूणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. या मित्राने सिगारेटचे व्यसन लावले म्हणूनच आपल्याला आयुष्याला मुकावे लागत असल्याच्या गैरसमजातून या तरूणाने मित्रावर गोळ्या झाडल्या. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 28, 2017, 04:07 PM IST
सिगारेटचे व्यसन लावल्यामुळे कॅन्सरग्रस्त तरूणाकडून मित्राची हत्या

नवी दिल्ली : वाईट संगतीचा शेवटही किती वाईट असू शकतो, हे दाखवणारा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका २५ वर्षीय कॅन्सरग्रस्त (कर्करोग) तरूणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. या मित्राने सिगारेटचे व्यसन लावले म्हणूनच आपल्याला आयुष्याला मुकावे लागत असल्याच्या गैरसमजातून या तरूणाने मित्रावर गोळ्या झाडल्या. 

पश्चिम दिल्लीच्या एका रेस्टॉरंटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. इनायत असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. तर, मुस्तकीम असे हत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. दोघेही दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये कूक म्हणून काम करत होते. दरम्यान, नेहमीच्या सहवासामुळे दोघांमध्ये मैत्री झाली.  दरम्यान, चांगल्या कामगिरीमुळे इनायतचे कौतुक होत असे. तसेच, दोघांचेही कामाचे क्षेत्र एकच असले तरी, इनायतने आपल्या व्यक्तिगत कामगिरीच्या जोरावर चांगले यश मिळवले. त्याचे यश पाहून आसूयेची एक सुप्त भावना मुस्तकीमच्या डोक्यात होतीच.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुस्तकीम घशाच्या आजाराने त्रस्त झाला. त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला असता त्याला घशाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. रोगाचे निदान होताच आपण मूळचे चांगले होतो. मात्र, इनायतच्या संगतीमुळेच आपल्याला सिगारेटचे व्यसन लागले. जे आज घशाच्या कर्करोगाचे कारण बनले, असा समज मुस्तकीमने करून घेतला. यातच त्याच्या कामाचा दर्जाही कमालीचा खालावला. त्यामुळे कंपनी प्रशासनाने त्याला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराचा राग डोक्यात गेल्याने मुस्तकीमने इनायतचा काटा काढायचे ठरवले.

घडल्या प्रकारानंतर मुस्तकीम थेट आपल्या उत्तर प्रदेशातील मूळ गावी गेला. तेथे त्याने बंदूक खरेदी केली. तसेच, इनायतची हत्या करायचीच हे पक्के केले. त्याच्या डोक्यात राग इतका टोकाला गेला होता की, नेम चुकू नये म्हणून हत्या करण्यापूर्वी मुस्तकीमने खूप वेळा सरावही केला होता. परत आल्यावर त्याने इनायतसोबतचा वाद उकरून काढला. बोलणे सुरू असतानाच त्याने इनायतवर गोळीबार सुरू केला.  यात इनायत गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.