Ram Mandir Inauguration Ceremony : अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण पहायला मिळतंय. अशातच आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक बड्या नेत्यांना निमंत्रण देण्यात देण्यात आलं आहे. अशातच आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण नाकारल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस पक्षातर्फे एक निवेदन जारी करण्यात आले आहे.
नेमकं कारण काय?
काँग्रेसचे (Congress Party) सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केलं. 22 जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. धर्म ही वैयक्तिक बाब असून आरएसएसने याला दीर्घकाळ राजकीय कार्यक्रम बनवला. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या फायद्यासाठी केले जात आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
काँग्रेसने नेमकं काय म्हटलंय?
गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येत आयोजित कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या देशात लाखो लोक रामाची पूजा करतात. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. पण आरएसएस आणि भाजपने अयोध्येतील मंदिराला दीर्घकाळ राजकीय कार्यक्रम बनवला आहे.अपूर्ण मंदिराचे उद्घाटन निवडणुकीच्या फायद्यासाठी केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण स्पष्टपणे आणि आदरपूर्वक नाकारलं आहे, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, राम मंदिर सोहळ्याला वारकरी संप्रदायातील संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बडवे समाजातील थोर संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज, रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पात, देवाचे सेवाधारी आणि ज्याच्याघरी 400 वर्षांपासून पांडुरंगाच्या पादुका असणारे हरिदास अशा मान्यवरांना राम मंदिर केंद्रीय समितीकडून उदघाटन सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय.