Intermediate Fasting Dieting : बदललेली जीवनशैली आणि त्यातूनच लागलेल्या, शरीरावर वाईट परिणाम करणाऱ्या सवयी दूर करण्यासाठी अनेकांचेच प्रयत्न सुरू असतात. कामातून, रोजच्या आयुष्यातून येणारा ताण, त्यानंतर या ताणापोटी अवाजवी खाण्याची सवय, या सवयीमुळं वाढलेलं वजन आणि एके दिवशी आपल्या याच चुकीची झालेली जाणीव... हे असं चक्र सध्या अनेकांनीच जीवनात अनुभवलं असावं.
याच आत्मपरिक्षणानंतर अनेक मंडळी डाएटिंग, आहाराच्या सवयींमध्ये केले जाणारे बदल या निर्णयांवर पोहोचात. अगदी खुद्द आहारजत्ज्ञ असो किंवा मग सामान्य नागरिक असो, प्रौढ असो वा तरुण असो. अनेकांचाच डाएटिंगकडे कल असल्याचं पाहायला मिळतं. याच डाएटिंगच्या नवनवीन संकल्पनाही दिवसागणिक पाहायला मिळतात. त्यातीलच एक संकल्पना म्हणजे इंटरमिडीएट फास्टींग.
सोप्या भाषेत सांगावं तर, दिवसाच्या ठराविक तासांसाठी केलेला उपवास. एका संशोधनातून मात्र डाएटिंगच्या या प्रकारासंदर्भातील अनपेक्षित माहिती समोर आली आहे. ज्यानुसार सततच्या उपवासामुळं मोठ्या प्रमाणात केसगळती होऊन व्यक्तीला टक्कल पडण्याची भीती असते. चीनच्या झेजियांगमधील वेस्टलेक विद्यापीठातील संशोधकांच्या अध्ययनानुसार फास्टिंगचा समावेश असणाऱ्या डाएटमुळं केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या उर्जेची कमतरता भासू लागले.
अधूनमधून उपवास केल्यामुळं शरीराला उर्जेचा मर्यादित पुरवठा होऊन केसांच्या पेशींचं नुकसान होतं. अनेकदा या परिस्थितमध्ये केसांच्या पेशींना नुकसान पोहोचवणारी रसायनं शरीरातून बाहेर पडतात आणि इथं डिमेंशियाचाही धोका वाढतो. निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार दर दिवशी 18 तास उपाशी राहणाऱ्या आणि त्यानुसार आहाराचं सेवन करणाऱ्यांच्या केस वाढीचा वेग 18 टक्क्यांनी कमी होतो.
दरम्यान, अधूनमधून उपवास करणाऱ्यांमध्ये या संशोधनातून भीती निर्माण करण्याचा आपला हेतू नसून अशा उपवास किंवा आहाराच्या असंतुलिक सवयींचा शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो ही बाब नाकराता येत नाही हेच या संधोशनातून दाखवून द्यायचं असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं. सदर संशोधनासाठी उंदरांवर प्रयोग करण्यात आला. जिथं मानवाप्रमाणंच त्यांना ठराविक तास उपाशी ठेवून त्यानंतर त्यांना अन्न दिलं गेलं, ज्यातून वरील निष्कर्ष संशोधकांच्या हाती आले.
(वरील संदर्भ संशोधनाच्या निष्कर्षातून घेण्यात आले असून, झी 24तास त्याची खातरजमा करत नाही.)