IAS Saumya Pandey Rank: साधारणपणे, अनेक उमेदवारांना युपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षं लागतात. जगातील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एक मानली जाणारी ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी काही उमेदवारांना तब्बल सहा प्रयत्न करावे लागतात. युपीएससी परीक्षेचे एकूण तीन टप्पे असतात. ज्यामध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश आहे. ही खूप कठीण परीक्षा आहे असून त्यासाठी अभ्यासक्रमाची चांगली समज आवश्यक आहे. बहुतेक उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक प्रयत्न करतात.
तथापि, 2017 उत्तर प्रदेश केडरच्या IAS अधिकारी सौम्या पांडे यांनी 2016 मध्ये पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना ऑल इंडिया रँकमध्ये चौथा क्रमांक मिळाला. 12 जानेवारी 1994 रोजी प्रयागराजमध्ये जन्मलेल्या सौम्या पांडे याच शहरातील विद्यार्थिनी होत्या. अभ्यासात हुशार असण्यासोबतच, सौम्या पांडे एक उत्कृष्ट खेळाडू आहेच. त्यांनी शालेय जीवनात जलतरण आणि बास्केटबॉलमध्ये पदकं जिंकली होती.
सौम्या पांडे यांना दहावीच्या परीक्षेत 98 टक्के मिळाले होते. यासह त्या जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकावर आल्या होत्या. तसंच 12 वीत त्यांना 97.8 टक्के मिळाले होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी मोतीलाल नेहरु नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्येही त्यांनी टॉप केलं आणि 2015 मध्ये गोल्ड मेडल जिंकलं. पुढच्या वर्षी त्यांनी युपीएससीची परिक्षा दिली. निकाल जाहीर झाल्यानंतर सौम्या पांडे आपल्या आईसह पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी यादीमध्ये खालून नावं पाहण्यास सुरुवात केली होती. पण यावेळी त्यांना आपलं नाव टॉप 5 मध्ये आहे याची कल्पनाच नव्हती.
सौम्या पांडे सोशल मीडियावर प्रकाशझोतात आल्या जेव्हा त्यांचा एका वृद्ध अपंग व्यक्तीसोबत बसलेला आणि चर्चा करत असतानाचा फोटो व्हायरल झाला. सौम्या म्हणतात की, प्रिलिअम्सची तयारी मूलभूत गोष्टींपासून सुरू व्हायला हवी. यासाठी NCERT च्या पुस्तकांपेक्षा चांगला पर्याय नाही. सौम्या यांनी शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षणदेखील घेतलं आहे. त्या बास्केटबॉल खेळाडू देखील आहेत. याशिवाय त्या एनसीसी बी आणि सी प्रमाणपत्र धारक देखील आहेत.