Success Story: एखाद्याचं यश दिसतं, पण त्यासाठी त्याने केलेला संघर्ष हा मात्र अनेकांना दिसत आहे. प्रशासकीय सेवेत निवड झालेले असे अनेक तरुण-तरुणी आहेत त्यांनी संघर्ष करत हे यश मिळवलं आहे. आयआरएस अधिकारी कोमल गणात्रा यांच्याही मार्गात अनेक अडथळे आलो होते. पण त्यांनी पराभव स्विकारला नाही आणि संघर्ष केला. पहिलं लग्न तुटल्यानंतर त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. पण यानंतर त्यांनी हार मानली नाही. कुटुंबापासून दूर राहत त्यांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी केली. इंटरनेट तसंच मुलभूत सुविधा नसतानाही कोमल यांनी सर्वात कठीण परीक्षांपैकी असणारी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. सध्या त्या भारतीय महसूल सेवेत (IRS) अधिकारी आहेत. कोमल यांचं हे यश खचलेल्या अनेक तरुणींसाठी उदाहरण आहे.
कोमल गणात्रा यांचं वयाच्या 26 व्या वर्षी लग्न झालं होतं. लग्नानंतर प्रत्येक मुलीप्रमाणे त्यांनीही सुखी संसाराची स्वप्नं रंगवली होती. पण त्याचं हे स्वप्न अधुरंच राहिलं. कारण लग्नाच्या दोन आठवड्यातच त्यांचा पती त्यांना सोडून न्यूझीलंडला निघून गेला. कोमल यांचं एका एनआरआय मुलाशी लग्न झालं होतं. यानंतर मात्र कोमल फार खचल्या होत्या. त्यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला होता. पण यावेळी त्यांच्या वडिलांनी मनोबल उंचावण्यास मदत केली. तसंच शिक्षण हा एक त्यांच्यासाठी मोठा आधार ठरला आणि जीवनदान दिलं.
कोलम यांनी युपीएससीची तयारी सुरु केली. यावेळीही त्यांना संघर्ष चुकला नाही. आपला भूतकाळ सतावत असताना दुसरीकडे त्यांना युपीएससी परीक्षेत वारंवार अपयश येत होतं. पण त्यानंतरही त्यांनी प्रयत्न करणं थांबवलं नाही. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि चौथ्या प्रयत्नात त्यांनी युपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली.
कोमल सांगतात की, माझ्या घऱात कधीही मुलगा-मुलगी असा भेदभाव पाहण्यास मिळाला नाही. मुलगी होणं कमी किंवा चुकीचं आहे याची जाणीवही मला कधी झाली नाही. माझे वडील आणि दोन्ही भावांनी फक्त इतकंच सांगितलं की, 'तू स्पेशल आहे. महत्त्वाची आहेस. तू आयुष्यात हवं ते करु शकतेस. तुला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे'.
लहानपणासून आमच्या मनात हेच बीज रुजवण्यात आलं होतं. लहानपणापासून वडिलांची वागणूक आणि आईमुळे मिळणारा आत्मविश्वास वेगळाच होता असं त्या सांगतात.
युपीएससी परीक्षेची तयारी करत असताना कोमल यांनी एका शाळेत शिक्षिकेची नोकरी केली. मी आई-वडिलांपासून दूर 40 किमी एका गावात शिकवण्यासाठी जात होती. पण यादरम्यान मला लोकांकडून कोणताही त्रास झला नाही. याउलट मला तिथे मान मिळत होता. पण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळतं तेव्हा त्यासह काही जबाबदाऱ्याही येतात हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ध्येयावरुन आपलं लक्ष हटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा तुम्ही भरकटता तेव्हाच समस्या सुरु होतात. पण जेव्हा तुम्ही यशस्वी होतात तेव्हा आपोआप टीका करणाऱ्यांचं तोंड बंद होतं असं कोमल सांगतात.
पुढे त्यांनी सांगितलं आहे की, जर एखाद्या मुलीला आई-वडील किंवा कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळाला नाही तर आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. मेहनतीशिवाय पर्याय नाही हे समजून घ्यावं लागेल. जर तुम्ही लक्ष्य समोर ठेवून वाटचाल केली तर यश मिळणार हे नक्की आहे.
कोमल यांनी यावेळी आपला एक अनुभवही शेअर केला आहे. त्या सांगतात की, "मी एका डॉक्टर आणि महिलेचं बोलणं ऐकलं होतं. ती महिला सतत रडत होत. डॉक्टरने महिलेला जर दुखत असेल तर थोडा वेळ बसा असं सांगितलं. जास्तच दुखत असेल तर मग तुम्ही आत या. तुम्ही आम्हाला नेमका काय त्रास होत आहे हे सांगितलं तर बरं होईल. त्यानंतरच आम्ही तुमच्यावर इलाज करु शकतो. अनेक लोक आपल्या अडचणींवर फक्त रडत असतात. पण त्यावर तोडगा काढत नाहीत. त्यामुळे आयुष्यात अडचण आली तर रडायचं की त्यावर तोडगा काढायचा यावर विचार करा".