नवी दिल्ली : आज जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day)आहे. आजच्या या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण तणावाचे जीवन जगत आहे. आजचं हे यूग घडाळ्याच्या काट्यावर आधारलेलं असल्यामुळे नैराश्य, तणाव त्यामुळे येणारा थकवा या सगळ्या गोष्टी मानवी विचारांसाठी दिवसागणिक धोकादायक ठरत आहेत. भारतात प्रत्येक चौथ्या मिनिटाला एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे आपल्या देशात आत्महत्येने साथीचे रूप धारण केले आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
राष्ट्रीय गुन्हे नोंद अभिप्रायच्या म्हणण्यानुसार, भारतात दररोज ३८१ लोक आत्महत्या करतात. म्हणजेच एका तासात जवळपास १६ लोक आत्महत्या करतात. २०१९ साली एकूण १ लाख ३९ हजार १२३ जणांनी आत्महत्या केली होती. तर २०१८ सालापेक्षा ही संख्या ३.४ टक्क्यांनी जास्त आहे. म्हणजेच आत्महत्या करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, देशात ३२.४ टक्के लोकांनी कौटुंबीक वादामुळे तर १७.१ टक्के लोकांनी आपल्या आजाराला कंटाळून जीवन संपवले आहे. त्याचप्रमाणे ५.५ टक्के लोकांनी वैवाहिक कारणांमुळे टोकाचे पाऊल उचलले आहे. ४.५ आत्महत्या प्रेम प्रकरणांमुळे झाल्या आहेत.
महत्त्वाचं म्हणजे देशात २ टक्के आत्महत्या बेरोजगारी आणि परीक्षांमध्ये अपयश मिळाल्याने झाल्या आहेत. तर ५.६ टक्के लोकांनी ड्रग्सच्या आहारी गेल्यामुळे आपले जीवन संपवले आहे. भारतातील आत्महत्या करण्याचे प्रमाण जागतिक सरासरीच्या ६० टक्क्यांहून अधिक आहे.
२०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना 'ग्लोबल बर्डन ऑफ डिसिसी'ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी भारतात २.३ लाख लोक आत्महत्या करीत आहेत. म्हणजेच भारतात दर चार मिनिटांनी एखादी व्यक्ती आत्महत्या करत आहे.