नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही एकनाथ खडसे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी शुक्रवारी 'झी २४ तास'शी बोलताना तसे सांगितले. यावेळी त्यांनी म्हटले की, एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास त्यांचे स्वागतच होईल. त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादीला होईल. खडसे यांच्यामागे मोठा समाज आहे. त्यामुळे खडसे ज्या पक्षात जातील त्यांना फायदाच होईल, असे तटकरे यांनी सांगितले.
तत्पूर्वी काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय भूकंप होईल, असे भाकीत वर्तविले. त्यामुळे हे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल, असेही राऊत यांनी सांगितले. सुनील तटकरे यांनी राऊत यांच्या विधानाला दुजोरा दिला. एकनाथ खडसे नागपूर अधिवेशनावेळी मोठा निर्णय घेण्याची शक्यताही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीत भाजपने मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारले होते. खडसेंऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. हा पराभव भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे झाल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे सातत्याने भाजप नेतृत्वावर तोफ डागत फिरत आहेत.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यानेही समाधान न झाल्यामुळे खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराचकाळ चर्चा झाली. यानंतर खडसे यांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे आता खडसे नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.