नवी दिल्ली: खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडला. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले होते.
त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री उलटसुलट वक्तव्य करत असल्याचाही आरोप सुळे यांनी केला.
दरम्यान, सकल मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील बंद आंदोलन दिवसभर चांगलेच गाजले.
दुपारी अडीचच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतरही नवी मुंबईत आंदोलक माघार घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे नवी मुंबईत अजूनही तणाव आहे.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला. सकल मराठा समाजाने हिंसा किंवा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारशी चर्चा करावी. मराठा समाजाशी चर्चा करण्यास सरकार सदैव तयार आहे, असे त्यांनी सांगितले.