भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायम

TC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 17, 2024, 09:55 AM IST
भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायम title=
टीसीची प्रकृती चिंताजनक आहे

TC Jumps Off At Railway Station From Speeding Express: मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर रेल्वे स्थानकामध्ये शनिवारी एक फारच विचित्र घटना घडली. येथील एका धावत्या ट्रेनमधून चक्क तिकीट तपासणीसाने म्हणजेच टीसीने उडी मारली. ही ट्रेन पलाटाजवळून जात असतानाच एका डब्यातून टीसीने पलाटाच्याविरुद्ध बाजूने ट्रेनमधून खाली उडी मारली. कंबरेखालील भाग चाकाखाली येईल या भीतीने या टीसीने ट्रेनपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नादरम्यान त्याने आपले दोन्ही पाय गमावले.

फोटो सोशल मीडियावर चर्चेत

या टीसीच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याचं पलाटावरील प्रवाशांच्या लक्षात आलं. उडी मारल्यानंतर काही मिनिटं टीसी दोन्ही बाजूच्या रेल्वे ट्रॅकदरम्यानच्या जागेवर पडून होता. अखेर रेल्वे स्थानाकावरील कर्मचाऱ्यांनी या टीसीला मदत करत त्याला ट्रॅकवरुन बाहेर आणलं. जखमी टीसीचं नाव रमेश कुमार असं आहे. या दुर्घटनेनंतरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये जखमी टीसीला पोलीस रेल्वे ट्रॅकवरुन स्ट्रेचरवरुन प्लॅटफॉर्मवर आणत असल्याचं दिसत आहे. 

कोणत्या ट्रेनमधून मारली उडी

समोर आलेल्या माहितीनुसार हा सारा प्रकार सकाळी 9 ते 10 वाजण्याच्यादरम्यान घडला. कन्याकुमारी सुपरफास्ट एक्सप्रेस ग्वाल्हेर स्थानकामधून जात असताना घडला. या गाडीला ग्वाल्हेर स्थानकामध्ये थांबा नाही. मात्र ज्या ट्रॅकवरुन ही ट्रेन केली. त्याच्या समोर असलेल्या प्लॅटफॉर्मवरुन भरधाव वेगातील या ट्रेनमधून एका व्यक्तीने उडी मारल्याचं काही प्रवाशांनी पाहिलं. या चालकाच्या पायाचा काही भाग चाकाखाली आल्याने त्याचा गंभीर दुखापत झाली आहे. 

दोन्ही पाय तुटले

समोरच्या प्लॅटफॉर्मवर अन्य एका गाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांनी जीआरपीला यासंदर्भात कळवलं. अधिकारी आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तसेच जीआरपी, आरपीएफने तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र या टीसीचे दोन्ही पाय तुटल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं.

उडी का मारली गूढ कायम

कुमार यांनी स्वत:हून ट्रेनमधून उडी मारली की त्यांना कोणी धक्का दिला यासंदर्भातील गूढ कायम आहे. सध्या कुमार यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर येत आहे. अनेकदा लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टीसींनी पकडल्यानंतर टीसी आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची आणि वाद होताना दिसतात. अशाच एखाद्या वादातून हा प्रकार तर घडला नाही ना? याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या कुमार हे जबाब नोंदवण्याच्या अवस्थेत नसल्याने त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. यामध्येच त्यांनी अशाप्रकारे धावत्या ट्रेनमधून उडी का मारली हे स्पष्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.