तुमचा चहा महागला, 20 टक्क्यांची वाढ; आता एक किलोसाठी मोजावे लागणार इतके पैसे!

Tea Price Hike: चहाच्या उत्पादनात घट झाल्याने चहाच्या किंमतीत जवळपास 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 10, 2024, 07:07 AM IST
तुमचा चहा महागला, 20 टक्क्यांची वाढ; आता एक किलोसाठी मोजावे लागणार इतके पैसे! title=
Tea prices hike 20 percent as heatwaves and floods

Tea Price Hike: पहिले उष्णतेची लाट आणि नंतर मुसळधार पाऊस याचा फटका चहाच्या उत्पादनावर झाला आहे. पावसामुळं चहाच्या मळ्यात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं त्याच्या परिणाम चहाच्या उत्पादनावर होत आहे. परिणामी त्यामुळं चहाच्या किंमतीत 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. टी बोर्ड ऑफ इंडियाने चहाच्या उत्पादनात फटका बसल्याने किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ केली आहे. 

टी बोर्ड ऑफ इंडियाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जूनच्या अखेरच्या आठवड्यात चहाची किमत 217.53 रुपये प्रति किलो झाली आहे. जून 2023मध्ये चहा प्रति किलो 181.22 रुपये इतकी किंमत होती. चहाच्या किंमतीत 20 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. केडियाच्या अॅडवायजरीनुसार, देशात असम राज्यात चहाचे उप्तादन मागील वर्षाच्या तुलनेत 10 कोटी किलोग्रॅम कमी झाले आहे. 

चहाचे उत्पादन किती कमी झाले?

- 2023मध्ये चहाचे उत्पादन 139.4 कोटी किलोग्रॅम इतके होते. तर 2024 साली जवळपास 7 टक्क्यांनी घट होऊन 129.40 कोटी किलो झाले आहे. 

- मेमध्ये चहाच्या उत्पादनात 30 टक्क्यांनी घट झाली आहे. ही घट 9.09 कोटी किलोग्रॅमच्या सर्वात निच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. 

- 20 किटकनाशकांच्या वापरावर सरकारने बंदी घातली आहे. त्याचा परिणामही चहाच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन कमी झाल्याने त्याचा परिणाम किंमतीवर झाला आहे. 

देशातील एकूण चहा उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक चहाची कापणी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होते.

चहाचे शेअर्स वाढले 

चहाच्या किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर यापुढेही किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळंच मंगळवारी चहाच्या शेअर्समध्ये 10 ते 15 टक्क्यांनी उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. हॅरीसन, मल्याळम, जय श्री टी अॅड इंडस्ट्रीज, मॅक्लिओड रसेल इंडिया आणि रोसेल इंडिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे शेअर्स 15 टक्के वाढून 2,323 रुपयांवर पोहोचले आहेत. 

चहाचे दर जरी वाढले असले तरी त्याचा परिणाम चहाच्या निर्यातीवर झालेला नाहीये. त्याचे कारण म्हणजे खरेदीदार कीटकनाशकांवर बंदी आल्यानंतरही त्यांच्या ऑर्डर वाढवत आहेत. 2024 च्या पहिल्या चार महिन्यांत भारताच्या चहाची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत 37% ने वाढून 92 दशलक्ष किलो झाली आहे. सीटीसी ग्रेड चहाची प्रामुख्याने ब्रिटन आणि इजिप्तमध्ये निर्यात होते.