झाबुआ : मध्यप्रदेशातील आदिवासी भागातील झाबुआ जिल्ह्यात एका सरकारी शाळेत १२ वर्षांच्या मुलीला एक भयंकर शिक्षा देण्यात आली.
होमवर्क न केल्याने शिक्षकांनी ही शिक्षा सुनावली. होमवर्क न केल्याने वर्गातील विद्यार्थ्यांना सहा दिवस १६८ थप्पड देण्यास सांगितले. हा प्रकार समोर आल्यानंतर विद्या्र्थ्याच्या वडीलांनी मुख्याध्यापकांकडे या शिक्षकाची लेखी तक्रार केली आहे.
थांदला तहसील मुख्यालयात स्थित असलेल्या जवाहर नवोद्य आवासिय विद्यालयातील ही घटना असून पीडित विद्यार्थींनी ६ व्या इयत्तेत शिकते. याप्रकरणी वडीलांनी केलेल्या लेखी तक्रारीत असे म्हटले आहे की, पीडित विद्यार्थींनी काही दिवसांपासून आजारी असून उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते आणि याच कारणाने तिचा अभ्यास राहीला. त्यामुळे ११ जानेवारीला शाळेत गेल्यावर अभ्यास पूर्ण न झाल्याच्या कारणावरून विज्ञानाचे शिक्षक मनोज कुमार वर्मा यांनी भयंकर शिक्षा केली. वर्गातील विद्यार्थ्यांकडून ११ ते १६ जानेवारी या सहा दिवसात रोज २-२ अशाप्रकारे १६८ थप्पड देण्यास सांगितले. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होवून ती अधिक आजारी पडली. त्याचबरोबर ती खूप घाबरली असून शाळेत जाण्यास नकार देत आहे. सध्या तिच्यावर थांदला सरकारी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
थांदला पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक एसएस बघेल यांनी सांगितले की, पीडित विद्यार्थीनीच्या वडीलांनी याबद्दल तक्रार दाखल केली आहे. तिची वैद्यकीय तपासणी केल्यास तिला कोठेही मारहाण झाल्याचे आढळलेले नाही. मात्र इतर विद्यार्थ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. आम्ही या प्रकरणी अधिक तपास करत आहोत.
तर शाळेचे मुख्याध्यापक के. सागर हे शिक्षकांचा बचाव करताना दिसले. ते म्हणाले की, ही एक फ्रेंडली शिक्षा आहे. जे विद्यार्थी अभ्यासात कमजोर असतात त्यांना शाळेतील नियमांनुसार तुम्ही शिक्षा देऊ शकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी वर्मा यांनी ही फ्रेंडली शिक्षा केली. त्याचबरोबर मुलांना हळूवार थप्पड मारण्यास सांगितले. तरी देखील आम्ही या प्रकरणी तज्ञांशी चर्चा करू.
जिल्हाधिकारी आशिष सक्सेना यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.