हैदराबाद एन्काऊंटर प्रकरण उच्च न्यायालयात, आरोपींचं पार्थिव सुरक्षित ठेवण्याचे आदेश

हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं 

Updated: Dec 7, 2019, 08:44 AM IST
हैदराबाद एन्काऊंटर प्रकरण उच्च न्यायालयात, आरोपींचं पार्थिव सुरक्षित ठेवण्याचे आदेश

हैदराबाद : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. घटनास्थळी नेत असताना चौघांचं एन्काऊंटर करण्यात आलं. या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले. हैदराबादचं हे एन्काऊंटर प्रकरण आता उच्च न्यायालयात गेलं आहे. एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या चारही आरोपींचं पार्थिव ९ डिसेंबर रात्री ८ वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे देश तेलंगणा उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच चारही आरोपींचं पोस्टमॉर्टम करतानाचं शूटिंग करा, असं न्यायालयाने सांगितलं आहे. न्यायालयाने या एन्काऊंटरचा रिपोर्टही मागितला आहे.

घटनास्थळावर नेल्यानंतर आरोपींनी पोलिसांकडची शस्त्र हिसकावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पोलिसांवर गोळीबारही केला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपींवर गोळीबार केला, यामध्ये ते मारले गेले, असं पोलीस उपायुक्त शमशाबाद प्रकाश रेड्डी यांनी सांगितलं. हैदराबाद शहरापासून ५० किमी लांब शादनगर शहराच्या चाटनपेल्लीमध्ये सकाळी ६ वाजता हे एन्काऊंटर करण्यात आलं.

१० पोलीस या आरोपींना घेऊन पहाटे ५.४५ वाजता घटनास्थळी गेले. पीडित महिलेला जाळल्यानंतर तिकडे लपवण्यात आलेल्या मोबाईल आणि इतर गोष्टींचा शोध घेण्यासाठी आम्ही आरोपींना घेऊन गेलो होतो. आरोपींनी घटनास्थळावर पोहोचल्यावर पोलिसांवर दगडफेक केली, छडी आणि इतर धारदार शस्त्रांनी त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यातल्या २ आरोपींनी पोलिसांकडची बंदूक घेतली आणि फायरिंग केली, असा दावा सायबराबाद पोलीस आयुक्त वी.सी.सज्जनार यांनी केला.

पोलिसांनी आरोपींना आत्मसमर्पण करायला सांगितलं, पण त्यांनी गोळीबार सुरुच ठेवला, अखेर पोलिसांनाही गोळीबार करावा लागला, यामध्ये ४ आरोपींचा मृत्यू झाला, असं सज्जनार यांनी सांगितलं.

मुख्य आरोपी मोहम्मद आरिफ आणि चेन्नाकेशवुलू या दोन आरोपींच्या हातात बंदूक होती. दोन पोलिसांच्या डोक्याला दुखापत झाली, पण दोघांनाही गोळी लागली नाही. आरोपींनी पोलिसांकडून घेतलेल्या बंदुका अनलॉक होत्या. तसंच आरोपींच्या हातात बेड्या घालण्यात आलेल्या नव्हत्या, असं सज्जनार यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या एन्काऊंटर प्रकरणाचा रिपोर्ट मागितला आहे. आम्ही सगळे रिपोर्ट देऊ, असं वक्तव्य सज्जनार यांनी केलं आहे. एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या ४ आरोपींची नावं लॉरी चालक मोहम्मद आरिफ (वय २६ वर्ष), चिंताकुंटा चेन्नाकेशवुलू (वय २० वर्ष), लॉरी क्लिनर जोलू शिवा (वय २० वर्ष) आणि जोलू नवीन (वय २० वर्ष) आहे.

या चारही आरोपींना पोलिसांनी २९ नोव्हेंबरला अटक केली होती. पुढच्याच दिवशी शादनगरच्या न्यायालयाने त्यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. यानंतर चौघांना चेरलापल्लीच्या जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं. तर एका न्यायालयाने आरोपींना २ डिसेंबरला १० दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवलं होतं. आम्ही ४ आणि ५ डिसेंबरला आरोपींची चौकशी केली, असं सज्जनार म्हणाले.

बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर तेलंगणा सरकारने जलद सुनावणी व्हावी यासाठी महबूबनगरमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली. 

हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबरला ४ आरोपींनी पहिले पीडित महिलेची गाडी पंक्चर केली आणि  मदत करण्याचं नाटक केलं. यानंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळच्या निर्जन स्थळी घेऊन गेले. याठिकाणी महिलेवर अत्याचार करण्यात आले. यानंतर पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेऊन हैदराबाद-बंगळुरू नॅशनल हायवेवर तिला जाळण्यात आलं.