मुंबई : भारताबरोबर मैत्रीची इच्छा व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानचा (Pakistan) खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तान मोठा कट रचत असल्याचं गुप्तचर अहवालातून समोर आले आहे.
दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न
गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनुसार, दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या (Lashkar-e-Taiba) लॉन्चिंग कमांडरसह 7 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. तर अल बद्र या दहशतवादी संघटनेचे 5 दहशतवादी पीओकेमधूनही घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.
गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पीओकेमधील (PoK) दातोटेच्या (Datote) निक्याल (Nikyal) भागात अल बद्रचे 5 दहशतवादी एका गाईडसोबत दिसले आहेत. हे दहशतवादी तारकुंडी (Tarkundi) किंवा कांगगली (Kangagali) भागातून काश्मीरमध्ये घुसून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पीओकेमधून काश्मीरमध्ये घुसखोरी
त्याचवेळी लष्कर-ए-तोयबाचे 7 दहशतवादीही भारतात हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये लष्कराच्या लाँचिंग कमांडरचा समावेश आहे. हे दहशतवादी पीओकेमध्ये तळ ठोकून आहेत. हे दहशतवादी काश्मीरमधील किनारी भागात घुसून पीओकेमधून मोठा हल्ला करू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी जम्मू-काश्मीरसह देशातील सर्व पोलीस दल आणि निमलष्करी दलांना हाय अलर्टवर राहण्यास सांगितलं आहे. धोक्याची सूचना मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सतर्कता वाढवण्यात आली असून सीमावर्ती भागात विशेष दक्षता घेण्यात येत आहे.