'आम्हाला अयोध्या नको, कर्जमाफी हवीय'

या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे

Updated: Nov 30, 2018, 10:19 AM IST
'आम्हाला अयोध्या नको, कर्जमाफी हवीय'  title=

नवी दिल्ली : 'आम्हाला अयोध्या नको, कर्जमाफी हवीय' असं म्हणत रामलीला मैदानात देशभरातील शेतकरी एकवटलाय. कृषी संकट दूर करण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानात देशभरातील शेतकरी एकवटला आहे. रामलीला मैदान ते संसद मार्ग दरम्यान 'शेतकरी मुक्ती मार्च' काढण्यात येणार आहे. कर्जमाफी, हमीभाव आणि संसदेत कृषी संकटावर चर्चा करण्याची मागणी डाव्या पक्षांच्या झेंड्याखाली एकत्र शेतकरी आलेत. अखिल भारतीय शेतकरी समन्वय समितीतर्फे आंदोलन आयोजित केले. यात २०० शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार मधून मोठ्या प्रमाणावर शेतकरी दिल्लीत आले आहेत. 

महाराष्ट्रातून राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. दिवसभर चालणाऱ्या आंदोलनात दिल्लीचे मुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, एच डी देवेगौडा, जिग्नेश मेवाणी, राहुल गांधी यांना निमंत्रण पाठवले आहे.

२९ नोव्हेंबर रोजी २६ किलोमीटर पायी यात्रा केल्यानंतर आज शेतकरी हजारोंच्या संख्येनं संसदेसाठी रवाना होतील. बुधवारपासून देशभरातील शेतकरी दिल्लीत दाखल होत होते. सुरक्षेच्या कारणास्तव जागोजागी पोलीस दल तैनात करण्यात आलंय. शहरात जवळपास ३५०० पोलीस कर्चारी तैनात करण्यात आलेत.  

शांतिपूर्ण रुपात आंदोलन करू दिलं नाही तर आम्ही अर्ध नग्न होऊन आंदोलन करू, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय.