Cough Syrup Controversy : भारतीय बनावटीचं कफ सिरप (Cough Syrup) प्यायल्याने उझबेकिस्तानमध्ये (Uzbekistan) 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. गाझियाबादच्या औषध निरीक्षकाच्या तक्रारीवरून, औषधाचे नमुने चाचणीत अपयशी ठरल्यानंतर गुरुवारी रात्री तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या नोएडामधील सेक्टर 67 मध्ये असलेल्या कंपनीमध्ये तयार करण्यात आलेले कफ सिरप उझबेकिस्तानमधील 18 मुलांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे म्हटले जात होते. या आरोपांनंतर या कंपनीच्या चौकशीस सुरुवात झाली होती. त्यानंतर चाचणीमध्ये मेरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या औषध निर्मिती कंपनीने तयार केलेले कफ सिरप मानकांची पूर्तता करत नसल्याचे आढळून आले. यानंतर गाझियाबादचे ड्रग इन्स्पेक्टर आशिष यांनी गुरुवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
सेक्टर 67 मधील मेरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या औषध निर्मिती कंपनीने तयार केलेले कफ सिरप मानकांची पूर्तता करत नाही, असा आरोप आशिष यांनी आपल्या तक्रारीत केला होता. तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी कंपनीच्या संचालिका जया जैन, सचिन जैन, ऑपरेशन हेड तुहिन भट्टाचार्य, मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट अतुल रावल आणि मूल सिंग आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला. त्यानंतर पोलिसांनी तुहीन भट्टाचार्य, अतुल रावत आणि मूल सिंग यांना अटक केली आहे. कंपनीचे मालक जया जैन आणि सचिन जैन फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या कफ सिरफने उझबेकिस्तानमध्ये 18 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. कझाकिस्तान सरकारकडून माहिती घेत भारत सरकारने या प्रकरणी कारवाई सुरु केली. 29 डिसेंबर रोजी कंपनीवर छापा टाकून कफ सिरपचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने मेरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा औषध उत्पादन परवानाही रद्द केला होता. सरकारने या कंपनीच्या उत्पादनांवरही बंदी घातली होती.