ट्रम्प भारतात येण्याआधीच अमेरिकेचे सिक्रेट सर्व्हिस एजंट अहमदाबादमध्ये दाखल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ फेब्रुवारीला अहमदाबाद दौऱ्यावर येत आहेत.

Updated: Feb 18, 2020, 11:26 PM IST
ट्रम्प भारतात येण्याआधीच अमेरिकेचे सिक्रेट सर्व्हिस एजंट अहमदाबादमध्ये दाखल title=
प्रातिनिधीक फोटो

अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ फेब्रुवारीला अहमदाबाद दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्तानं त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणारे सिक्रेट सर्व्हिस एजंटचं पहिलं पथक अहमदाबादेत दाखल झालं आहे. ट्रम्प यांच्यासोबत हे सिक्रेट सर्व्हिस एजंट सावलीसारखे वावरतात, त्यामुळेच ट्रम्प हे जगातले सर्वात सुरक्षित व्यक्ती ठरतात.

ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम झाला, तेव्हा ट्रम्प यांच्या सभोवती सुरक्षारक्षकांचा वेढा होता. जिथं जिथं ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबीय जातात, तिथं हे एजंट आधीच पोहोचलेले असतात.

येत्या २४ फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणारे सिक्रेट सर्व्हिस एजंट अहमदाबादमध्ये पोहोचलेत. त्यांचं विमान दुपारीच विमानतळावर लँड झालं. भारतात पंतप्रधान आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींना एसपीजी सुरक्षा असते. मात्र त्यापेक्षा कितीतरी पट अधिक मजबूत सुरक्षाव्यवस्था अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची असते.

अहमदाबादमधील नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो देखील होणार आहे. त्यावेळी अहमदाबादमध्ये सात स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात असणार आहे. 

मोटेरा स्टेडियमची सुरक्षा अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस टीमकडे असेल. NSG, SPG आणि CRPF जवानही तैनात असतील. ट्रम्प यांच्यासाठी ७ स्तरीय सुरक्षा असेल. रोड शोसाठी ७ टीम तयार करण्यात आल्यात. रस्त्याच्या दुतर्फा १० हजार पोलीस कर्मचारी तैनात असतील. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी एकूण २५ हजार जवान कार्यरत असतील.

गुजरात पोलिसांचे जवान साध्या वेशातही तैनात असतील. अत्याधुनिक संरक्षण यंत्रणा असलेल्या ३०० गाड्या इथं असतील. त्याशिवाय ट्रम्प यांच्यासाठी खास कार असेल. मोटेरा स्टेडियमवर ३० खाटांच्या विशेष हॉस्पिटलची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचणं मुश्कील ही नही, नामुमकीन है.