टीव्ही अभिनेत्याने संपूर्ण कुटुंबाला घातल्या गोळ्या; दिवसाढवळ्या शेतात थरार, 1 ठार तर तिघे जखमी

उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे एका टीव्ही अभिनेत्याने अगदी फिल्मी स्टाइलमध्ये दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार केला आहे. चार लोकांवर करण्यात आलेल्या या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 7, 2023, 01:47 PM IST
टीव्ही अभिनेत्याने संपूर्ण कुटुंबाला घातल्या गोळ्या; दिवसाढवळ्या शेतात थरार, 1 ठार तर तिघे जखमी title=

उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ज्युनिअर अभिनेत्याने दिवसाढवळ्या कुटुंबावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. अभिनेत्याने एकदम फिल्मी स्टाईलमध्ये एकाच कुटुंबातील 4 सदस्यांवर गोळ्या झाडत रक्तबंबाळ केलं. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. तसंच 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

बिजनौर येथील बढापूर कुआ खेडा गावात हा सगळा प्रकार घडला आहे. बुधवारी दुपारी टीव्ही अभिनेता भूपेंद्र सिंह याचा शेताच्या टोकाशी असणाऱ्या झाडावरुन गोविंद सिंह नावाच्या व्यक्तीशी वाद झाला. यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका वाढला की, भूपेंद्र सिंहने आपल्याब बंदुकीने दिवसाढवळ्या गोळीबार सुरु केला. 

गोळीबाराचा आवाज ऐकताच गोविंद सिंह यांचं कुटुंबीय त्यांच्या मदतीसाठी धावलं. पण भूपेंद्र सिंहने त्यांनाही सोडलं नाही आणि त्यांच्यावरही गोळीबार सुरु केला. यादरम्यान गोळी लागल्याने गोविंद सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर 3 सदस्य गंभीर जखमी झाले. 

जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे या गोळीबाराची दखल मुरादाबादचे डीआयजी मुनिराज यांनी घेत घटनास्थळ गाठलं होतं. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. पोलिसांनी याप्रकरणी भूपेंद्र सिंह याच्यासह आणखी तिघांना अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

भूपेंद्र सिंह याने मधुबाला एक इश्‍क एक जुनून, काला टीका, कार्तिक पूर्णिमा आणि एक हसीना या टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.