जम्मू-काश्मीर : मशिदीत लपून बसलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

पंपोर भागातील मीजगाव येथील मशिदीत दहशतवादी लपून बसले होते.   

Updated: Jun 19, 2020, 11:07 AM IST
जम्मू-काश्मीर : मशिदीत लपून बसलेल्या तीन  दहशतवाद्यांचा खात्मा title=

श्रीनगर :  जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरा आणि शोपियामध्ये शुक्रवारी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांना ठार करण्यात  जवानांना यश मिळालं आहे. पंपोर भागातील मीज गाव येथील मशिदीत दहशतवादी लपून बसले होते. याच पार्श्वभूमीवर अद्यापही मुनांदमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे. या सर्व घटनेची माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली आहे. 

ते म्हणाले, 'अवंतीपोरा जिल्ह्यातील पंपोर भागात गुरूवारी तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तात्काळ भारतीय जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. रात्री  २ वाजल्यापासून सुरू असलेल्या चकमकीत अखेर जवानांना यश मिळालं. जेव्हा पंपोर भागातील मीज गाव भागात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला तेव्हा अन्य दोन दहशतवादी जवळच्या मशिदीत लपून बसले असल्याची माहिती दिलबाग सिंह यांनी दिली

दरम्यान, खबरादारीचा उपाय म्हणून याठिकाणी अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. रात्रभर चालू असलेल्या चकमकीनंतर शुक्रवारी पहाटे जवानांनी मशिदीत लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवादी जामिया मशिदीत लपून बसले होते. या भागात आणखी दहशतवादी  लपून बसल्याची शक्यता जवानांनी वर्तवली आहे.