पनवेल ते बोरीवली थेट प्रवास फक्त 20 रुपयांत? रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प; नागरिकांचा प्रवास सुकर होणार

Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व्हावा म्हणून रेल्वेकडून नवनवीन प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 29, 2024, 12:08 PM IST
पनवेल ते बोरीवली थेट प्रवास फक्त 20 रुपयांत? रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प; नागरिकांचा प्रवास सुकर होणार title=
Mumbai Local train updates Goregaon Borivali harbour line project finally underway

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेने बहुप्रतीक्षीत गोरेगाव-बोरीवली हार्बर लाइन  प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर मालाड स्थानकात एक एलिव्हेटेड स्थानकाचे कामही प्रगतीपथावर आहे. सध्या कांदिवली आणि बोरीवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गंतच आणखी दोन मार्गिका जोडल्या जातील ज्या सध्याच्या हार्बर लाईनचा विस्तार असतील. 

या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात गोरेगाव ते मालाडपर्यंत 2 किमीचा टप्पा आहे. या पहिला टप्पा 2026 ते 27 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. तर. दुसऱ्या टप्प्यात मालाड ते बोरीवलीपर्यंतचा 5 किमीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. हा दुसरा टप्पा 2027 ते 28 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर मालाडजवळ उन्नत विभाग असतील आणि प्रकल्पासाठी अंदाजे 2,731 चौरस मीटर जमीन आवश्यक आहे. यामध्ये 16 तीन मजली रेल्वेच्या इमारतींचे पाडकाम करण्यात येईल, ज्यामुळे अंदाजे 520 रहिवाशांना याचा फटका बसणार आहे. 

2,731 चौरस मीटर जमीनीपैकी 2,535 वर्गमीटर जमीन खासगी असून 196 वर्गमीटर जमीन पालिकेडून हस्तांतरीत करण्यात आली आहे. यातील अधिकांश जमीन मलाड आणि कांदिवली दरम्यान आहे. 16 तीन मजली रेल्वे क्वॉटर्सपैकी 12 कांदिवली पश्चिममध्ये आणि चार तीन मदली क्वॉटर्स मालाड पश्चिममध्ये आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास 825 कोटींचा खर्च करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेकडून MUTP-3A अंतर्गत हे काम केले जाणार आहे

सध्या हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव-पनवेल, सीएसएमटी ते अंधेरी-गोरेगावपर्यंत लोकल धावतात. मात्र, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर थेट बोरीवली-पनवेलपर्यंत थेट लोकल सुरू होणार आहे. 72 किमीचा प्रवास ट्रेन न बदलता फक्त 20 रुपयांत करता येणार आहे.  हार्बर मार्गाचा आणखी विस्तार होणार आहे. ही लोकल सुरू झाल्यानंतर मुंबईहून पनवेलपर्यंत पोहोचणे सोप्पे होणार आहे. लोकलची वाढती गर्दी पाहता हे रेल्वे प्रवास प्रवाशांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.  

एप्रिल, 2023 ते मार्च, 2024  य आर्थिक वर्ष पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार दरम्यान प्रवासी संख्येत जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हार्बरच्या विस्ताराला गती देण्यासाठी गोरेगाव ते मालाड (2 किमी) आणि मालाड ते बोरिवली (6 किमी) असा एकूण 8 किमीचा मार्ग पूर्ण करण्यात येणार येत आहे.